मुंबई : मुलुंड पश्चिम येथे राहणाऱ्या ४१वर्षीय महिलेचा १२ नोव्हेंबर रोजी डेंग्यूमुळे मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर डेंग्यूच्या बळींची संख्या आता १६वर पोहोचली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, १० जणांचा मृत्यू हा डेंग्यूमुळे झाला असून, हा तिसऱ्या संशयित डेंग्यू रुग्णाचा मृत्यू आहे. पौर्णिमा अय्यर (४१) असे मृत महिलेचे नाव आहे. मुलुंड पश्चिम भागातील सिटी आॅफ जॉय या कॉम्प्लेक्समध्ये पौर्णिमा राहात होत्या. एका बँकेमध्ये त्या मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या. मुलुंडच्या सारथी या खासगी रुग्णालयामध्ये पौर्णिमा यांना ९ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना प्लॅटिनम रुग्णालयात हलवण्यात आले.पौर्णिमा यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होताना दिसत नव्हती. १२ नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती अजूनच खालावली होती. त्यांचे अवयव निष्क्रिय होत गेले आणि १२ नोव्हेंबरला रात्री त्यांचा मृत्यू झाला, असे पौर्णिमाचे नातेवाईक पी.एस. नागराज यांनी सांगितले. सिटी आॅफ जॉय या कॉम्प्लेक्समधील ९ ते १० जणांना डेंग्यू झाल्याचे लक्षात आल्यावर महापालिकेमध्ये तक्रार दाखल केली होती. यापैकी काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मुलुंडमध्ये महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचा संशय
By admin | Updated: November 18, 2014 02:58 IST