अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मागणीत सातत्याने होत असलेली वाढ आणि दुष्काळी परिस्थितीत घटलेले उत्पादन यामुळे डाळींच्या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसला आहे. दीड महिन्यांतच क्विंटलमागे सरासरी दीड ते दोन हजार रुपयांची वाढ झाली असून, या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांनाच होताना दिसत आहे. तूर, मूग आणि हरभरा डाळ यांच्या दराचा आलेख ऐन दुष्काळातच वाढत चालला आहे.
महागाई दिवसेंदिवस वाढत असताना, आता पुन्हा डाळींच्या दराने त्यात मोठी भर टाकली आहे. तुरीचे पीक फेब्रुवारीच्या दुसºया आठवड्यात आले. तूरडाळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात मुबलक प्रमाणात विक्रीस आली, तेव्हा ठोक बाजारात प्रतिकिलो ५० ते ६० रुपये भावाने विक्री झाली. दीड महिन्यातच प्रतिकिलोचे भाव ८० ते ९० रुपयांवर पोहोचले आहेत. कमी पावसामुळे यावर्षी तुरीसह सर्वच कडधान्यांचे पीक कमी येण्याचा कृषी तज्ज्ञांचा अंदाज होता. सर्व बाबी हेरून व्यापाºयांनी डाळींचे भाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तूरडाळ पुन्हा शंभर रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.सांगलीसह लातूर, बीड परिसरातून येथील मार्केटमध्ये डाळींची आवक मोठ्या प्रमाणावर होत असते.
मान्सून आणि परतीचा पाऊस कमी झाल्यामुळे कडधान्याची पेरणी कमी झाली आहे. म्हणूनच सध्या डाळींच्या किमती वाढत आहेत. यावर्षी पाऊस झाला नाही, तर पुन्हा डाळींच्या किमतीमध्ये वाढच होण्याची शक्यता आहे. मागील दीड महिन्यांपेक्षा सध्या प्रति क्विंटलला सरासरी दीड ते दोन हजाराने डाळींचे दर वाढले आहेत. - वसंत माळी, व्यापारी,वसंतदादा मार्केट यार्ड, सांगली.