जेजुरी : येत्या गुरुवारी तीर्थक्षेत्र जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त यात्रा भरणार असून या यात्रेनिमित्त गाढवांचा बाजारही भरणार आहे. बाजारासाठी राज्यभरातून गाढवे जेजुरीत दाखल होऊ लागली आहेत. गुजरातमधील आमरेली भागातून सुमारे सव्वाशे गाढवे जेजुरीत दाखल झाली आहेत. दरवर्षी पौष पौर्णिमेला अठरापगड जाती-जमातींची जेजुरीत मोठी यात्रा भरते. वैदू, कोल्हाटी, बेलदार, कैकाडी, वडारी, कुंभार, डोंबारी, परीट, पाथरवट, गारुडी आदी भटक्या जाती-जमातींचे लोक यात्रेनिमित्त जेजुरीत येत आहेत. या भटक्या-विमुक्तांचे पारंपरिक उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे गाढव. भाविक जेजुरीस येताना याच साधनाचा वाहक म्हणून वापर करीत जेजुरीत येत असल्याने गाढवांची संख्या ही मोठी असते. यातूनच गाढवांची खरेदी-विक्री होऊ लागली. पुढे पुढे त्याला बाजाराचे स्वरूप आले. यामुळेच पौष पौर्णिमेला भटक्या-विमुक्तांच्या यात्रेबरोबरच गाढवांचा बाजार प्रसिद्ध झाला आहे. दि. ११ व १२ रोजी यात्रा व बाजार भरणार आहे. त्याचबरोबर वैदूंची जातपंचायत आणि कुस्त्यांचा आखाडाही भरत असतो. भातू कोल्हाटी समाजाची ही जातपंचायत भरत असते. या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय उभे राहत असल्याने या बाजाराला ही जागा कमी पडू लागली आहे. बाजारासाठी यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. साधारणपणे यात्रेला येणारे भाविक जेजुरीत दोन ते तीन दिवस मुक्काम करीत असल्याने जेजुरी नगरपालिका आणि मार्तंड देव संस्थानकडून भाविकांना बंगाली पटांगणावर स्वच्छतेबरोबरच पिण्याच्या पाणी, वीज, इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. येथील जागा व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या भाविकांकडून होत आहे. दोन दिवसांपासून येथे गाढवे येऊ लागली आहेत. येथील पालखी मैदान, बंगाली पटांगणात उतरली असून उद्यापर्यंत व्यापारी येतील. परवा बुधवारी व गुरुवारी बाजार भरणार आहे. (वार्ताहर)
जेजुरीत भरणार गाढवांचा बाजार
By admin | Published: January 10, 2017 2:35 AM