संतोष वानखडे ल्ल वाशिमविविध वाणांच्या बियाणे टंचाईवर पर्याय म्हणून कृषी विभागाने सुचविलेल्या घरगुती बियाण्याला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. उगवण क्षमता तपासून शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांचा वापर केल्याने, २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये राज्यात खासगी संस्थांची बियाणे विक्री जवळपास निम्यावर आली आहे. राज्यात २०१३ मध्ये खरिपाच्या बियाण्यांची विक्री २०.६१ लाख क्विंटल, तर २०१४ मध्ये हाच आकडा ११.९५ लाख क्विंटलवर आला असल्याची साक्ष कृषी आयुक्तालयाची आकडेवारी देत आहे. राज्याच्या एकूण ३०७.५८ लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रांपैकी पिकांखालील स्थूल क्षेत्र २३१.१६ लाख हेक्टर, तर निव्वळ पेरणी क्षेत्र १७३.४४ लाख हेक्टर आहे. २०१४ च्या खरीप हंगामात १४५.७९ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. तत्पूर्वी राज्यात सोयाबीन व अन्य वाणांची टंचाई गृहीत धरून, कृषी विभागाने घरगुती बियाणे वापरण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. केवळ घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यावरच कृषी विभाग थांबला नाही; तर घरगुती बियाण्यांची उगवण क्षमता कशी तपासावी, दर्जेदार घरगुती बियाणे तयार करण्याचे प्रात्यक्षिकही दिले. विशेषत: विदर्भात हा प्रयोग सार्वत्रिक स्वरूपात राबविण्यात आला. घरगुती बियाणे तयार करण्याच्या या सोप्या पद्धतीला शेतकऱ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला. यामुळे विदर्भात खाजगी बियाणे उत्पादक व कंपन्यांच्या बियाणे विक्रीचा आकडा २०१४ मध्ये कमालीचा घटला. २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये सोयाबीनच्या पेरणीत वाढ झालेली असतानाही कंपनीच्या बियाणे विक्रीत मात्र घट झाली. २०१३ मध्ये ३५.१० लाख हेक्टर क्षेत्रावर, तर २०१४ मध्ये ३८.१ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. उर्वरित क्षेत्रावर तूर, मूग, उडीद, ज्वारी, कपाशी आदी वाणांची पेरणी झाली होती. ४जिल्ह्यात दोन लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मागणी आहे. २०१४ च्या खरीप हंगामात ४२ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे खासगी संस्था किंवा कंपनीकडून शेतकऱ्यांनी खरेदी केले. उर्वरित एक लाख ५८ हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी घरगुती वापरले, असा अर्थ यामधून निघतो. यावर्षीदेखील घरगुती बियाण्यांचा वापर करण्याबाबत राज्यभर प्रचार-प्रसार केला जात आहे. - अभिजित देवगीरकर, जिल्हा कृषी अधिकारी, वाशिम
बियाणे टंचाईवर आता घरगुती पर्याय!
By admin | Updated: May 27, 2015 23:38 IST