डोंबिवली : वडाळ््याहून ठाण्याला येणारी मेट्रो डोंबिवली, कल्याण, भिवंडीपर्यंत आणली जाईल. त्याचा अहवाल तयार आहे, असे आश्वासन जरी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले; तरी प्रत्यक्षात त्यांनीच ठाण्याची मेट्रो कल्याणहून थेट भिवंडीला नेल्याने डोंबिवलीकरांचे मेट्रो स्वप्न भंगले आहे. आधी स्मार्ट सिटीचे पॅकेज साडेचार हजारांनी घटले. आता मेट्रोचा प्रकल्प हातातून गेला. त्यामुळे यावेळीही डोंबिवलीतील नेत्यांची राजकीय इच्छाशक्ती आणि दवाब कमी पडल्यानेच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी या शहराचा विचार होत नसल्याचे दिसते.एमएमआरडीच्या एकंदर नियोजनावर नजर टाकली असता, मेट्रोच्या सध्याच्या जाळ््याचा पुरेसा विस्तार झालेला असल्याने आणि आधीचेच प्रस्ताव पूर्ण होण्यात भरपूर अडथळे असल्याने यापुढील काळात मेट्रोचा नवा मार्ग अशक्य असल्याचे दिसते.वडाळ््याची मेट्रो कासावडवलीहून कल्याण-भिवंडीपर्यंत जाणार आहे. मात्र रोजची प्रवाशांची संख्या वाढून ती १३ लाखांवर गेलेली असतानाही डोंबिवलीच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. अपघातांच्या संख्येत झालेली वाढ, गर्दीच्या वेळांत गाड्या वाढवण्यात मध्य रेल्वेला आलेले अपयश यामुळे किमान मेट्रोचा पर्याय तरी उपलब्ध होईल, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र तिला केराची टोपली दाखवण्यात आली. राज्य सरकार विकसित करीत असलेले कल्याण ग्रोथ सेंटर, निळजे-देसाई-कल्याण फाट्यापर्यंत वाढलेल्या वस्तीला अंतर-प्रवासाच्या दृष्टीने डोंबिवली स्टेशन जवळचे आहे. त्यामुळे तेथे जसजशी वस्ती वाढत जाईल, तसा या स्टेशनातील ताण वाढत जाईल.मेट्रोच्या मार्गविस्ताराबाबत एमएमआरडीएचे अधिकारीही काहीही बोलण्यास तयार नाहीत. ठाण्यापर्यंत येणारा मेट्रोचा मार्ग भिवंडीपर्यंत नेण्यासाठी तेथील खासदार कपिल पाटील प्रयत्नशील होते. मात्र डोंबिवलीतील शिवसेना, मनसेच्या नेत्यांनी मेट्रोचा मार्ग ठाण्यातून डोंबिवलीमार्गे कल्याणला आणावा आणि पुढे तो भिवंडीला जोडावा अशी मागणी केली होती. तळोजा रेल्वे स्टेशनपर्यंत नवी मुंबईची मेट्रो येणार आहे. ती पुढे आणून त्या मेट्रोला शीळपासून ठाण्याची-डोंबिवलीची मेट्रो जोडण्याची कल्पनाही काहींनी मांडली होती. मात्र त्या केवळ मागण्या होत्या. त्यावर फक्त निवेदने दिली गेली. डोंबिवली-भिवंडीदरम्यानचा पूल प्रकल्प आणि दुर्गाडीजवळील पुलाच्या भूमीपुजनावेळी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मेट्रो डोंबिवली-कल्याणला आणली जाईल, असे आश्वासन देत तसा अहवालही तयार असल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात मेट्रो डोंबिवलीकरांना वाकुल्या दाखवत ठाण्याहून कल्याण-भिवंडीला निघून गेली. (प्रतिनिधी)>ठाकुर्ली टर्मिनसचा अपुरा विस्तार डोंबिवलीतून लोकलच्या फेऱ्या वाढवायच्या असतील तर ठाकुर्ली टर्मिनसची दिशा बदलून त्याचा विस्तार होण्याची गरज होती. मात्र त्यात कोणीही लक्ष घातले नाही. ठाकुर्ली पॉवर हाऊसच्या परिसरातून गाडी कल्याणपर्यंत नेली जाते. मात्र डोंबिवली जवळ असूनही तेथे गाड्या वाढवल्या जात नाहीत. ठाकुर्ली टर्मिनसचा विस्तार झाल्यास कोपर, दिवा, मुंब्रा, कळव्याच्या प्रवाशांनाही फायदा होईल. मात्र रेल्वे त्यावर काम करण्यास तयार नाही. दिवा थांब्यामुळे कोंडीठाण्याच्या पालिका निवडणुकीसाठी दिव्यातील फलाटांची रचना बदलल्याने सध्या धीम्या मार्गवर गर्दीची घुसळण सुरू आहे. जलद मार्गावर थांबे वाढताच हा प्रश्न संघर्षाचा होण्याची चिन्हे आहेत. कल्याणहून सुटणाऱ्या लोकलची संख्या अधिक असल्याने डोंबिवलीतील प्रवाशांना त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.>नवी मुंबईचाही ठेंगाबेलापूर स्टेशनहून तळोजापर्यंत येणारी नवी मुंबईची मेट्रो डोंबिवलीमार्गे कल्याण-मुरबाडपर्यंत नेण्याचा मानस सिडकोचे त्यावेळचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी व्यक्त केला होता. मात्र त्यातही प्रगती झाली नाही. त्या मेट्रोनेही या शहराला ठेंगा दाखवला.
डोंबिवलीकरांचे मेट्रो स्वप्न भंगले
By admin | Updated: October 20, 2016 03:46 IST