ठाणे : कोपरी भागात जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांसमवेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी दरोडा टाकल्याची घटना ताजी असतानाच मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह आठ जणांविरुद्ध दरोडा, अपहरण, मारहाणीचे गुन्हे नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या टोळीने एकावर चॉपरने वार करून सोनसाखळी हिसकावल्याचा तसेच एकावर तलवारीने वार केल्याचाही आरोप आहे. २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३०च्या सुमारास सिद्धेश्वर तलावाजवळील ‘सेंट्रल कॉम्प्लेक्स’ इमारतीजवळ जयेश गवारी, त्यांचा मित्र किरण कदम तसेच त्याच परिसरातील काही मुले गप्पा मारीत उभे होते. त्याच वेळी टेकडी बंगला भागातील आठ जण आणि इतर सहा जणांनी जयेश आणि किरण यांना हत्यारांचा धाक दाखवला. त्यांनी त्यांना जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून चंदनवाडीत नेले. तिथे जाधव यांनी सुरज गुप्ता कोठे आहे, अशी विचारणा केली. नंतर, त्यांना शिवीगाळ करून लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यापैकी टॅटू याने जयेशवर चॉपरने वार करून त्याच्या गळ्यातील २० हजारांची सोनसाखळी हिसकावली. तर बाबू यादवने किरणवर तलवारीने आणि लोखंडी रॉडने वार केले. याप्रकरणी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बग्गा हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
मनसे शहराध्यक्षाविरुद्ध दरोड्याचा गुन्हा
By admin | Updated: February 23, 2015 02:53 IST