पुणे : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने कर्करोग होऊन अनेकांचा बळी जात असल्याने राज्यातील डॉक्टरांनी एकत्र येत ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियान’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील ५० डॉक्टरांची बैठक रविवारी पुण्यात झाली. यात शाळा, महाविद्यालयांसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून तेथून या अभियानाची सुरूवात करण्यात येणार आहे.बैठकीला टाटा कॅन्सर रुग्णालयातील सर्जिकल आॅन्कॉलॉजीस्ट डॉ. पंकज चतुर्वेदी, डॉ. पी. सी. गुप्ता, डॉ. प्रकाश गुप्ता, कान-घसा तज्ज्ञ डॉ. वंदना जोशी, डॉ. संजय सेठ, डॉ. निता घाटे आदी उपस्थित होते. डॉ. चतुर्वेदी म्हणाले, महाराष्ट्रात तिघांपैकी एक व्यक्ती तंबाखू किंवा तबांखूजन्य पदार्थ खातो. विदर्भात तंबाखू खाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तेथील सुमारे ६० टक्के कर्करोग हे तंबाखूमुळे होत आहेत. यासंदर्भात महाराष्ट्रात जनजागृती करण्यासाठी राज्यातील काही डॉक्टर सरसावले असून रविवारी झालेल्या बैठकीत यासंबंधीचे नियोजन करण्यात आले. लहान व तरुण युवकांचे योग्य प्रबोधन केले तर महाराष्ट्र तंबाखूमुक्त होईल. यामुळे आम्ही ‘बचपन बचाओ’ अभियान सुरू करणार असून या माध्यमातून मुलांना तंबाखूपासून रोखण्याचे प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.या अभियानात आम्ही राज्यशासनाची मदत घेणार असून शिक्षणमंत्री-शिक्षण संचालक,जिल्हा शिक्षणाधिकारी-मुख्याध्यापक अशा पद्धतीने आम्ही या अभियाची माहिती देत शाळेत पोहोचणार आहोत, असे डॉ. गुप्ता म्हणाले.
डॉक्टर राज्यात राबविणार तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियान
By admin | Updated: November 10, 2014 04:04 IST