रवींद्र साळवे,
मोखाडा- राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी अधिकारी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांची भेट घेऊन व्यथा मांडत आहेत, अस्थायी डॉक्टर्स, सफाई कामगार, रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका यांच्या नंतर आता पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागाचे मदत पथक कार्यरत आहे. या पथकाच्या प्रतिनिधींनी मंगळवारी विक्रमगड येथे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांची भेट घेतली.या वेळी त्यांनी त्यांच्या व्यथा विवेक पंडित यांच्या समोर मांडल्यात. त्या सोडवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू असे सांगून या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान असल्याने त्यांच्या न्याय हक्कांच्या लढ्यात मी त्यांना साथ देणार आहे, असे स्पष्ट केले. १९९५ पासून राज्यात हे मदत पथक कार्यरत आहे. विक्र मगड येथील कुर्झे प्राथमिक आरोग्य केंद्रात आज श्रमजीवी संघटना आणि श्री विठु माउली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषित बालक तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनासाठी ते विक्रमगड येथे आले असता त्यांच्या समोर आपल्या समस्या व व्यथा डॉक्टरांनी मांडल्या. विवेक पंडित यांनी तात्काळ या बाबत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना कल्पना देऊन या वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली. पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात साफ सफाइचे काम करणारे ४८ सफाई कामगार कंत्राटी तत्वावर काम करतात. त्यांना देखील अनेक महीने वेतन नाही जिल्हा परिषद या कर्मचाऱ्यांसाठी १२,५०० रूपये वेतन देते. मात्र ठेकेदार या कर्मचाऱ्यांना केवळ ६,५०० रूपये वेतन देत आहे. हीच अवस्था जिल्हा परिषदेच्या वाहनांवर काम करणाऱ्या कंत्राटी चालकांची आहे. सुट्ट्यांच्या दिवसांवरुनही अडचणी होतात.पालघर जिल्हा परिषदेने ठेके पद्धतीने भाडे तत्वावर ४० वाहने घेतली आहेत. ही वाहन जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्याचे काम करतात. एप्रिल २०१६ पासून या वाहनांचे भाडे देण्यात आलेले नाही. एकूणच जिल्हा परिषदेच्या व्यवस्थेचा पूर्ण बोजवार उडालेला दिसला. आज कुर्झे येथे शिबिरसाठी आलेल्या विवेक पंडित यांची वरील सर्व घटकांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. >एप्रिलपासून वेतन थकलेवावर वांगणी (जव्हार) भागात मोठ्या प्रमाणात बाल मृत्यू झाल्यानंतर तत्कालीन सरकारने राज्याच्या दुर्गम आदिवासी भागात काम करण्यासाठी अशा पथकांची स्थापना केली. त्यात आजच्या घडीला १७२ वैद्यकीय अधिकारी पूर्ण राज्यभरात कार्यरत आहेत. पैकी ३१ अधिकारी १९९५ पासून पालघर जिल्ह्यात कार्यरत आहेत. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणतीही सुरक्षा दिलेली नाही. केंद्र सरकारतर्फे १८ हजार तर राज्यसरकार तर्फे ६ हजार वेतन या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले जाते. एप्रिल २०१६ पासून राज्याच्या हिश्शाचे वेतन या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेले नाही. या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेने शासन दरबारी वारंवार मागणी करुन देखील कोणतीही दखल घेतली न गेल्याने अखेर या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विवेक पंडित यांची भेट घेतली.