मुंबई : सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरला गुरुवारी झालेल्या मारहाणीनंतर एफआयआर दाखल करण्यास गेलेल्या डॉक्टरांचा खोळंबा झाला, कारण सायन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना ‘डॉक्टर संरक्षण कायदा’च माहीत नव्हता. सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर रवि शिंदे यांना वॉर्ड क्रमांक ७ मध्ये दाखल अमोल देसाई व त्याच्या नातेवाईकाने मारहाण केली. यानंतर संतप्त निवासी डॉक्टरांनी पोलिसांकडे धाव घेतली. या वेळी पोलिसांनी फक्त एनसी दाखल करून घेतली. संध्याकाळी निवासी डॉक्टर पुन्हा पोलीस ठाण्यात गेले. डॉक्टर संरक्षण कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी डॉक्टरांनी केला. त्या वेळी असा कायदा माहीत नाही, असे उत्तर देत नेहमीच्या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यास तयार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पण हे टाळण्यास पोलीस ठाण्यात गेलेल्या निवासी डॉक्टरांनी न्यायालयाच्या संकेतस्थळावरून ‘डॉक्टर संरक्षण कायद्या’ची प्रत काढून पोलिसांना दिली. तेव्हा यातले कोणते कलम लावायचे, असा प्रश्न पोलिसांनी डॉक्टरांना विचारला. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे पोलिसांशी बोलले. यानंतर पोलिसांनी रात्री १२ नंतर डॉक्टर संरक्षण कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करून घेतला. (प्रतिनिधी)
एफआयआरसाठी डॉक्टरांचा खोळंबा
By admin | Updated: August 16, 2014 02:47 IST