ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक, अतिधोकादायक इमारती रिकाम्या करताना कोणीही अडथळा निर्माण केला, तर त्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे या इमारतींत वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने या नागरिकांना अभय देण्यात यावे, असे निवेदन विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. धोकादायक इमारतींच्या ‘सी १’ आणि ‘सी २ बी’ या संवर्गात ज्या इमारती येतात, त्या सर्व इमारती कोणत्याही परिस्थितीत रिकाम्या करून त्याचा अहवाल पुढील सोमवारपर्यंत सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले. वागळे इस्टेट विभागातील किसननगर, पडवळनगर व आजूबाजूच्या परिसरातील इमारतींची परिस्थिती अतिशय चांगली असूनही त्यांना धोकादायक ठरवून त्या रिकाम्या करत आहेत.>या सर्व इमारतींची पुन्हा एकदा पाहणी करून तसा अहवाल संबंधित विभागांना सादर करावा व आवश्यक असेल तरच इमारत जमीनदोस्त करण्याची कार्यवाही करणे योग्य ठरेल, असे मत फाटक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे. तसेच धोकादायक इमारतींचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, जेणेकरून या इमारतीत राहणाऱ्या लोकांना दिलासा मिळेल.
धोकादायक इमारतींवर सरसकट कारवाई नको
By admin | Updated: July 23, 2016 02:27 IST