मुंबई : यापुढे चिक्कीचा पुरवठा करू नका व कंत्राटदारांना पैसेही देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. गेले काही दिवस चिक्कीवर वाद सुरू आहे. त्यामुळे चिक्की थांबवण्याचे आदेश आम्ही देत आहोत. याचा अर्थ चिक्कीत दोष आहे, असा होत नाही. तसेच चिक्कीत दोष असतानाही सरकारने याचे वितरण केले, असाही याचा अर्थ होत नाही. जनहितार्थ आम्ही हे आदेश दिले आहेत, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.या प्रकरणी संदीप अहीर यांनी जनहित याचिका केली आहे. त्यात याचिकाकर्त्याने अजूनही चिक्कीचा पुरवठा सुरू असल्याचे दावा केला. हा दावा मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्याणी यांनी खोडून काढला.अहमदनगर येथील चिक्कीत दोष असल्याचा निष्कर्ष तेथील स्थानिक प्रयोगशाळेने काढला होता. मात्र पुणे येथील प्रयोगशाळेने चिक्कीत दोष नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यातूनही सरकारने चिक्कीचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे चाचणीसाठी पाठवले आहेत. त्यामुळे चिक्कीचा पुरवठ सुरू असल्यास त्याची माहिती याचिकाकर्त्याने प्रतिज्ञापत्रावर द्यावी, अशी मागणी अॅड. वग्याणी यांनी केली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने वरील आदेश दिले. (प्रतिनिधी)
चिक्कीचा पुरवठा करू नका - हायकोर्ट
By admin | Updated: September 16, 2015 01:08 IST