ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - महाराष्ट्रात सत्ताबदल झाला असला तरी या सत्तेचा टेकू राष्ट्रवादीच्या भ्रष्ट बांबूंचा असून महाराष्ट्रावर आत्मक्लेशाची वेळ आणणा-यांनी यापुढे शिवसेनेकडे आशेने बघू नये असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे. बाळासाहेबांची शिवसेना आजही तशीच असून हत्तीच्या वेगाने पण वाघाप्रमाणे लढा देत शिवसेना पुढे जात राहील असे ठाकरेंनी म्हटले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतीदिनी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. राज्यात राजकीय आचार विचारांचा चोथा झाला असून मोदींना खूश करण्यासाठी बारामतीच्या शरद पवारांनी हातात झाडू घेतला पण त्यांनी काय साफ केले असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. गेल्या १५ वर्षांत आघाडी सरकारला पडल्या नसतील तेवढ्या शिव्या नव्या सरकारला विश्वासदर्शक ठरावाचा 'तमाशा' पाहून पडल्या, भाजपाने पहिल्याच आठवड्यात जनतेच्या आशा - अपेक्षा व स्वप्नांचा चुराडा केला अशी टीका त्यांनी केली. गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय समाज जातीयता, धर्मांधता व कमालीची प्रांतीयता मनात ठेवून महाराष्ट्रात जगत असतो आणि हे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट होते. मात्र मराठी माणसाच्या मनात या भावना कधी पेटून उठणार असा भावनिक सवाल त्यांनी जनतेला विचारला. महाराष्ट्राच्या अखंडतेवर चोचा मारणारी अनेक गिधाडे फांद्याफांद्यांवर बसली आहेत व त्यांच्यापैकी काही जण सत्तेच्या गाद्यांवर बसून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे स्वप्न पाहताना दिसतात असे सांगत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. भाजपाने शिवसेनेसाठी सत्तेचे दार उघडे असल्याचे विधान केले असतानाच उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेत दिले आहे.