अतुल कुलकर्णी,
मुंबई- ऐन सणासुदीच्या तोंडावर व्यापाऱ्यांनी चणाडाळीची साठेबाजी सुरू केल्यामुळे राज्य सरकारने खुल्या बाजारात विकण्यासाठी केंद्र सरकारकडे ७०० मेट्रिक टन चणाडाळीची मागणी नोंदवली खरी, परंतु एवढ्याशा डाळीवर संपूर्ण राज्याची दिवाळी कशी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना बाजारात डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. बुधवारी मुंबईच्या होलसेल मार्केटमध्ये चणाडाळीचे भाव ९६८० होत, तर किरकोळ बाजारात हीच डाळ ११८ रुपये किलोने विकली गेली. नागपुरात बुधवारचा होलसेल दर ८९०० रुपये होता. सणासुदीच्या दिवसात साठेबाजांनी डाळींवर नफा मारल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.मध्यंतरी तूरडाळीचे भाव वाढले तेव्हा राज्य सरकारने केंद्राकडून ९० रुपये किलोने तूरडाळ विकत घेऊन ती खुल्या बाजारात ९५ रुपयांना विकली होती. ,शिवाय, रेशनदुकानात देखील ७ हजार मेट्रीक टन तूरडाळ १०३ रुपये किलो दराने विकण्यात आली. मात्र आता खुल्या बाजारात तूरडाळीचे भाव कमी झाल्याने आमची रेशनवरची डाळही कोणी घेईनासे झाले आहे. त्यामुळे केंद्राकडून मिळणारी १२०० मेट्रीक टन तूरडाळही आम्ही घेण्यात नकार दिला आहे, असेही बापट म्हणाले.।पहिल्या टप्प्यात ७०० मेट्रिक टन साठेबाजांवर वचक ठेवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडून ७० रुपये किलोने चणाडाळ खरेदी करून ती ७८ रुपये किलोने खुल्या बाजारात विकणार आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात किमान ३००० मेट्रिक टन चणाडाळ मागवली जाईल. गरजेनुसार ही मागणी ७ हजार मेट्रिक टनांपर्यंत नेऊ. पहिल्या टप्प्यात ७०० मेट्रिक टन चणाडाळ संपूर्ण राज्याला कशी पुरणार, असे विचारले असता साठेबाजांना वचक बसविण्यासाठी एवढी कृती पुरेशी असल्याचे बापट म्हणाले.