बेळगाव : ज्येष्ठ साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासाकडे आम्ही दुर्लक्ष केलेले नसून, आमच्यासाठी हे एक आव्हान आहे. याबाबत आमचे सीआयडीचे पथक गंभीर असून तपासात आम्ही महाराष्ट्र आणि गोव्याच्या पुढे असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा ठाम विश्वास कर्नाटकचे नूतन गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी व्यक्त केला.गृहमंत्री पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी बेळगाव येथील पोलीस मुख्यालयात बेळगावसह उत्तर कर्नाटकातील सहा जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बेळगाव, धारवाड, गदग, विजापूर आणि बागलकोट, हावेरी जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांसह बेळगाव पोलीस आयुक्त बैठकीला उपस्थित होते. गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले, हुबळीचे खासदार आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत कलबुर्गी यांचे मारेकरी मिळणार नाहीत, असे वक्तव्य केले असले, तरी आमचा कर्नाटकच्या ‘सीआयडी’वर पूर्णपणे विश्वास आहे. या प्रकरणाचा उलगडा होण्याच्या मार्गावर आहे. मी धारवाडला जाऊन कलबुर्गी कुटुंबीयांची भेट घेणार आहे. श्री राम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्यावरील १३ खटले राज्य सरकार मागे घेत असून, ही कार्यवाही अजूनही सुरू आहे. २००९ पूर्वी ज्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते, त्यावेळचा हा प्रस्ताव असून, एक कमिटी त्यावर निर्णय घेणार आहे.कर्नाटकात लवकरच आठ हजार पोलीस कॉन्स्टेबल आणि ४५0 पोलीस उपनिरीक्षक पदे भरली जाणार असून, याबाबत आठवडाभरात नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे. या पोलीस भरतीमुळे कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल आणि समस्यांही कमी होतील. याशिवाय बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालय इमारतीसाठी १४ कोटी मंजूर झाले असून, लवकरच प्रलंबित काम सुरू होईल, असे परमेश्वर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कलबुर्गी हत्येचा लवकरच उलगडा
By admin | Updated: January 6, 2016 00:38 IST