ऑनलाइन टीम
मुंबई दि. ३ - शिवसेनेशी युती ठेवायची की नाही यावरुन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे भाजपाच्या एका कार्यक्रमात दिसून आले आहे. भाजपाच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांनी हा युतीचा प्रकार म्हणजे तीन पायांची शर्यत असल्याचे सांगत हा प्रकार बंद करण्याची आणि भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी केली. भाजपाचे कार्यकर्ते अनेक वर्षे राबले आहेत आणि आता स्वबळावर वाढण्याचे दिवस आल्याचे चव्हाण म्हणाले. ही मागणी सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांची असल्याचेही ते म्हणाले. गेली २५ वर्षे भाजपा शिवसेनेची युती असून सहा वर्षांसाठी युतीचे सरकारही सत्तेत आले होते. मात्र, नरेंद्र मोदींच्या नावावर लढलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमधील दैदिप्यमान विजयानंतर भाजपाच्या राज्यातील पदाधिका-यांची महत्त्वाकांक्षा वाढल्याचे दिसत आहे.
मात्र, चव्हाण व अन्य पदाधिका-यांच्या भावनांचा उल्लेख स्वाभाविक करतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वैचारिक साधर्म्यावर ही युती असून ती एका दिवसात तोडता येणार नाही असे स्पष्ट केले. अर्थात, या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात भाजपा आहे आणि या ताज्या घडामोडींनंतर जास्त जागांसाठी शिवसेनेवर भाजपा दबाव टाकेल अशी शक्यता आहे.