नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. या वेळी गडकरी यांनी भागवत यांच्याशी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर चर्चा केल्याची माहिती आहे.
भागवत शुक्रवारी रात्री दिल्लीहून नागपुरात परत येताच रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. फडणवीस यांच्या नावाला संघाने हिरवा कंदील दिल्याची चर्चा सुरू असतानाच गडकरींनी शनिवारी सकाळी संघ मुख्यालय गाठले. त्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली.
मात्र गडकरी कधीही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नव्हते. ते मुख्यमंत्री व्हावेत अशी आमचीच भावना होती, असा खुलासा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला. विदर्भातील भाजपाच्या बहुसंख्य आमदारांनी गडकरी यांच्या हाती राज्याची सूत्रे देण्याची मागणी केली आहे.