ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.१२ - गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली भाजपा-शिवसेना दरम्यानची चर्चा अखेर निष्फळ ठरली असून शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी जाहीर केला. भाजपावर आता सेनेचा विश्वास राहिला नसून आम्ही विरोधी पक्षात बसण्याचा तसेच विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस भाजपाच्या विरोधात मतदान करणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
गेला महिनाभर आम्ही मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई अशा फे-या मारून भाजपाशी चर्चा करून तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला. भाजपासोबत जाऊन राज्याच्या विकासास हातभार लावू असाच आमचा विचार होता, मात्र भाजपाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. भाजपावर आमचा आता विश्वास उरला नसून भाजपाच्या मागे फरपटत न जाता विरोधी पक्षात बसायचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतला आहे, असे कदम यांनी सांगितले.
दरम्यान भाजपाने सेनेचे सर्व फेटाळून लावले आहेत. शिवसेनेनेच आपल्या दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यानी केला आहे. तर सेनेने राज्याच्या हितापेक्षा पक्षहिताला अधिक प्राधान्य दिल्याचे सांगत सेनेचा हा निर्णय अतिशय दुर्दैवी असल्याचे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
विश्वासदर्शक ठरावात भाजपाविरोधात मतदान करण्याच्या सेनेच्या या निर्णयामुळे भाजपाच्या अडचणींत वाढ झाली आहे.