डोंबिवली : साहित्य संमेलनाचा खर्च यंदा दुप्पट झाल्याने तो खरोखरीच किती कमी करता येईल, यावर महामंडळ आणि आयोजकांत दिवाळीनंतर २० नोव्हेंबरला चर्चा होणार आहे. राजकारण्यांचा वावर कमी करण्याची सूचनाही महामंडळाने केली असली तरी शिष्टाचाराचा भाग म्हणून तो रोखणे शक्य नसल्याची भूमिका आयोजकांनी घेतली आहे.संमेलनाचा खर्च आटोपशीर असावा, असे जरी महामंडळाने सुचविले असले तरी संमेलन हायटेक करण्यासाठी, त्याची वेबसाईट-अॅप तयार करण्यासाठी मोठा खर्च आहे. संमेलनचा मंडप, साहित्यिकांची निवास-प्रवास-मानधनाची व्यवस्था, साधारण तीन हजार रसिकांच्या निवासाची-भोजनाची व्यवस्था यावरच सर्वाधिक खर्च होणार असल्याने तो कमी करणे अशक्य असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संमेलन साधेपणाने साजरे करण्याची भूमिका असली तरी वस्तुस्थिती महामंडळाच्या सदस्यांपुढे मांडली जाणार आहे. व्यासपीठावर राजकीय व्यक्तींचा वावर नसावा, असे जरी साहित्यिक सुचवत असले तरी त्यातील कोणीही संमेलनाच्या खर्चाचा भार उचलण्यास, त्यासाठी वर्गणी गोळा करण्यास तयार नाही. त्यामुळे देणगीदार, आगरी समाजातील नेते, पालकमंत्री, राज्यमंत्री, महापौर, खासदार, आमदार यांचा यथोचित सन्मान करावाच लागेल, हेही आयोजक महामंडळाच्या लक्षात आणून देतील. त्यामुळे राजकीय वावर रोखण्याची सूचना जरी असली, तरी ती प्रत्यक्षात आणणे अशक्य असल्याचे महामंडळाच्या सदस्यांनाही मान्य आहे. त्यावर फक्त चर्चा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) >‘साहित्याला राजाश्रय हवा’संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अक्षयकुमार काळे, प्रवीण दवणे, जयप्रकाश घुमटकर या तिन्ही उमेदवारांनी ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. घुमटकर यांनी तर कलेला राजाश्रय हवा असतो या भूमिकेचा पुनरूच्चार केला आहे. राजकीय नेत्यांकडून संमेलनासाठी निधी घेतला जात असेल तर त्यांचा वावर का नसावा, असा प्रतिप्रश्न केला आहे. जी साहित्यिक मंडळी राजकारणात आहेत त्यांनाही संमेलनाच्या व्यासपीठावर नाकारणार का, असा मुद्दाही मांडला.>आम्ही शिष्टाचार पाळू - वझेनिमंत्रक आगरी युथ फोरमचे अध्यक्ष व स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले, आमदार आम्हाला त्यांच्या आमदार निधीतून मदत देणार असतील तर ती आम्ही स्वीकारणार. शिवाय पालकमंत्री, राज्यमंत्र्यांच्या कार्यक्षेता संमेलन होणार असल्याने आम्ही शिष्टाचार पाळणार. राजकीय म्हणून त्यांना किंवा महापौर, नगराध्यक्षांना संमेलनाच्या व्यासपीठावरुन टाळता येणार नाही.>या नेहमीच्या सूचना : मेहेंदळेमहामंडळाच्या पदाधिकारी उज्ज्वला मेहेंदळे यांनी सांगितले की, निमंत्रक संस्थेला दरवर्षी महामंडळाकडून काही सूचना केल्या जातात. त्यात या दोन सूचनांचा समावेश असतो. खर्च कमी करणे आणि राजकारण्यांचा वावर नसावा, या सूचना यावर्षीही महामंडळाने आयोजकांना केल्या आहेत. महामंडळासोबत निमंत्रक संस्थेची २० नोव्हेंबरला बैठक होणार आहे. त्यात हा मुद्दा चर्चिला जाईल.
संमेलनाच्या खर्चावर २० नोव्हेंबरला चर्चा
By admin | Updated: October 20, 2016 04:05 IST