हिवाळी अधिवेशन : विरोधकांचा वेलमध्ये ठिय्या, कामकाज रोखले नागपूर : अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधानसभेत दुष्काळावर चर्चा होऊ शकली नाही. सुरुवातीला विरोधकांनी कामकाज थांबवून आताच चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरत गोंधळ घातला. वेलमध्ये बसून ठिय्या मांडला. तर, सत्ताधारी विषयपत्रिकेत दाखविलेल्या वेळेवरच चर्चा होईल, या भूमिकेवर अडून राहिले. विरोधकांच्या गदारोळामुळे सुरुवातीला तीनदा सभागृह तहकूब करण्यात आले. शेवटी अध्यक्षांनी चर्चा पुकारली असता विरोधकांनी चर्चा नको, पॅकेज जाहीर करा, अशी घोषणाबाजी सुरू केली. परिणामी अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले. तर याच मुद्यावरून विधान परिषदेचेही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.विधानसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामकाज बाजूला सारून दुष्काळावर चर्चा घेण्याची मागणी केली. सोयाबीन हातून गेले, कापसाला भाव नाही. शेतकरी संकटात आहे, असे सांगून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने पॅकेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तरे पुकारली. यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येत दुष्काळावर चर्चा घेण्याची मागणी करीत नारेबाजी सुरू केली. यामुळे अध्यक्षांनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केला.महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारची चर्चेची तयारी असल्याचे सांगत, विषयपत्रिकेत चर्चा दाखविली असल्याचे सांगितले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नये, असा नेम साधला. यामुळे विरोधक आणखीनच भडकले व वेलमध्ये येऊन नारेबाजी करू लागले. विरोधकांकडून दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील, जयदत्त क्षीरसागर आदींनी मोर्चा सांभाळला. चर्चेशिवाय आधी पॅकेज जाहीर करा व नंतर चर्चा घ्या, अशी मागणी त्यांनी लावून धरली. अध्यक्षांनी प्रस्ताव नाकारल्याचे स्पष्ट करताच विरोधक नारेबाजी करीत वेलमध्ये आले. खडसे यांनी विषयपत्रिकेत चर्चा दाखविलेली असून निश्चित वेळेवरच चर्चा होईल, असे स्पष्ट केले. यामुळे विरोधक आणखीनच संतापले व सभागृहात एकच गदारोळ केला. परिणामी अध्यक्षांनी सलग दोनदा कामकाज अर्ध्या-अर्ध्या तासासाठी तहकूब केले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. शेवटी अध्यक्षांनी चर्चा पुकारली. सत्तापक्षातील आ. चैनसुख संचेती यांनी चर्चेची सुरुवात करीत गेल्या १५ वर्षांतील नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी संकटात असल्याची टीका विरोधकांवर केली. त्यामुळे विरोधकांनी पुन्हा ‘भाषण नको, पॅकेज हवे, अशा घोषणा देत गोंधळ घातला. शेवटी अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलरावते यांनी सभागृहाबाहेर केली पॅकेजची घोषणा!राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटींचे पॅकेज देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सभागृहात न करता पत्रकारांशी बोलताना केली. अधिवेशन चालू असताना मंत्र्यांनी सभागृहाबाहेर घोषणा करू नये, असे संकेत असतानाही रावतेंनी सभागृहाबाहेर घोषणा केल्याने उद्या विरोधकांना आणखी एक विषय मिळाला आहे. वास्तविक ही घोषणा मुख्यमंत्री किंवा महसूल मंत्र्यांनी सभागृहात करणे अपेक्षित असताना, रावतेंनी केलेल्या घोषणेने नव्या वादाला विषय मिळाला आहे.विरोधी पक्षनेतेपदासाठी आर.आर.पाटील विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँगे्रसने दावा केला आहे. विधानसभेत माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या तर परिषदेत धनंजय मुंडे यांच्या नावाची शिफारस अध्यक्ष व सभापती यांच्याकडे केल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ सदस्य आहेत; सोबतच ४ अपक्ष आमदारांनी पाठिंब्याचे पत्र दिल्याने पक्षाच्या सदस्यांची संख्या काँग्रेसपेक्षा अधिक आहे. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य आहेत. त्यामुळे दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्याची माहिती त्यांनी दिली. विधान परिषदेसंदर्भात वाद नाही. विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यासंदर्भात अध्यक्ष हरिभाऊ बागडे जो निर्णय घेतील, तो मान्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चर्चेचाही ‘दुष्काळ’!
By admin | Updated: December 10, 2014 00:41 IST