मुंबई : सरत्या वर्षातील गोड व कटू आठवणींना निरोप देत, नव्या उत्साहात, जल्लोषात मुंबईकरांनी २०१७ या वर्षाचे स्वागत केले. त्यात शनिवार आणि १ जानेवारीला रविवार हे सुट्टीचे दिवस आल्याने, दरवर्षीपेक्षा यंदाचा जल्लोष जास्तच दिसून आला. शहर-उपनगरातील पंचतारांकित हॉटेल्स, पब्स, चौपाट्या अशा ठिक-ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पार्ट्या रंगतानाच, तरुणाईने नव्या वर्षात ‘डिजिटल’ स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला. यंदा बऱ्याच ठिकाणी टेरेस पार्टीचा ट्रेंडही दिसून आला, तर काही ठिकाणी सायलंट पार्टीत तरुणाई झिंगताना दिसून आली. बहुतांश मुंबईकरांनी ‘वीकेन्ड’चा पुरेपूर फायदा घेत, सकाळपासून थर्टी फर्स्टचे ‘सेलिब्रेशन’ सुरू केले. काहींनी लगेचच मुंबईची कूस सोडत हायवेचा रस्ता धरला, तर काहींनी सरत्या वर्षाचा सूर्यास्त डोळ्यात साठविण्यासाठी समुद्रकिनारी ठाण मांडले. मुंबईकरांच्या ‘सेलिब्रेशन’ मूडला गालबोट लागू नये, म्हणून मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस सज्ज होते. एरव्ही घरात कुटुंबीयांसोबत टीव्हीवरील ‘स्पेशल’ कार्यक्रमांचा आस्वाद घेत, दिवस साजरा करणाऱ्यांचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाकडे लागून राहिल्याचे दिसून आले, परंतु एकूणच नव्या उमेदीने जगण्याचे आव्हान स्वीकारत मुंबईकरांनी नव्या वर्षाचे स्वागत केले. (प्रतिनिधी)लहानग्यांनी सांतासोबत साजरे केले नववर्ष- ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून ‘साई’ संस्थेने कर्करोगग्रस्त मुले आणि देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसोबत आनंद साजरा केला. या वेळी सांताक्लॉजच्या भेटीने लहानग्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.- या लहानग्यांना खाऊ आणि भेटवस्तूही दिल्या. भायखळा येथील एस ब्रीजजवळच्या पालिका शाळेत हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी हॉलीवूड आणि बॉलीवूड अभिनेते जे. ब्रॅन्डन हील सांताक्लॉजच्या वेशात हजर होते.
नवीन वर्षात संकल्प ‘डिजिटल’ स्वप्नांचा !
By admin | Updated: January 1, 2017 01:52 IST