ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - एका मॉडेलवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले मुंबईचे डीआयजी सुनील पारसकर यांच्या निलंबनाची शिफारस महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाकडून करण्यात आल्याने त्यांची गच्छंती अटळ मानण्यात येत आहे. ' पारसकर यांच्या निलंबनाची शिफारस करणारे पत्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आले आहे', अशी माहिती गृहमंत्रालयातील अधिका-याने दिली आहे.
१९९७च्या बॅचचे आयपीएस असलेल्या पारसकर यांच्यावर गोरेगाव येथे राहणा:या २६ वर्षीय मॉडेलने बलात्कार केल्याची तक्रार मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात दाखल केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बलात्काराचा आरोप करणारी मॉडेल आणि पारसकर एप्रिल २०१३पासून ओळखत होते. एप्रिलमध्ये मॉडेलने आपल्या भावाविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. भावाने आपल्या आईला मारहाण केल्याचा आरोप या मॉडेलने केला होता. मात्र दिंडोशी पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे दाद मागण्यासाठी ती पारसकर यांच्याकडे गेली होती. यानंतर ऑक्टोबरमध्ये याच मॉडेलने तिच्या सोसायटीत राहणा:या एका तरुणाविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली होती. काही दिवसांनी पारसकर यांनी ‘तू या प्रकरणात एकटय़ाने काहीच करू शकणार नाहीस, माझ्यायाशी संपर्क साध’, असे सूचित केल्याचा दावा या मॉडेलने केल्याचे समजते.
याच दरम्यान एका एस्कॉर्ट एजन्सीच्या वेबसाइटवर (वेश्याव्यवसायासाठी हायप्रोफाइल तरुणी पुरविणारे अवैध रॅकेट) या मॉडेलचा फोटो प्रसिद्ध झाला होता. त्याचा त्रस झाल्यानंतर मॉडेलने थेट उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त असणा:या पारसकर यांची भेट घेतली. याप्रकरणी पारसकर यांनी तपासाचे आदेश दिले. 2 जानेवारी 2014 रोजी वेबसाइटवर मॉडेलचा फोटो प्रसिद्ध करणा:यांविरोधात गुन्हा नोंदविला. तसेच या गुन्ह्यातील सर्वाना गजाआड केले.
मॉडेलच्या दाव्यानुसार, त्याआधी नोव्हेंबर-डिसेंबर 2013मध्ये पारसकर यांनी मला एक फ्लॅट दाखविण्याच्या निमित्ताने ठाण्यातील एका इमारतीत नेले. फ्लॅटमध्ये गेल्यावर पारसकर यांनी माङयाशी लगट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास मी विरोध केल्यानंतर त्यांनी माफी मागितली. आठवडय़ानंतर एका रिअल इस्टेट एजंटची भेट घालून देण्याच्या निमित्ताने पारसकर यांनी या मॉडेलला मढ बेटावरील बंगल्यात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. पारसकर यांच्या जबरदस्तीने आपण जखमी झालो, असा दावाही त्या मॉडेलने जबाबात केला. ही घटना घडल्यानंतर पारसकर यांनी या मॉडेलला आय-फोन भेट म्हणून दिला. तसेच एस्कॉर्ट एजन्सीच्या प्रकरणात मदत केल्याबद्दल ‘तूही मला काही तरी द्यावेस’, अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा मॉडेलने पारसकर यांना महागडय़ा घडय़ाळांचे (लॉन्जिनीज) फोटो पाठवले. त्यापैकी एक पारसकर यांनी पसंत केले. ते 70 हजारांचे घडय़ाळ मॉडेलने त्यांना भेट म्हणून दिले.
पारसकर यांची अपर आयुक्त पदावरून राज्य पोलीस मुख्यालयात बदली झाली. तेव्हा मॉडेलने पारसकर यांना 57 हजार रुपयांचे पाकीट (वॉलेट), पेन आणि परफ्युम गिफ्ट केले. तेव्हा बदली रोखण्यासाठी काही प्रयत्न करू शकतेस का, अशी विचारणा पारसकर यांनी केली होती. तेव्हा मॉडेलने तिच्या पीआर व्यवस्थापकाशी त्यांची भेट घालून दिली. त्यावेळी पारसकर यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. पारसकर यांनी केलेल्या अत्याचाराची माहिती त्यांच्या पत्नीला त्याचवेळी द्यायची होती; मात्र पारसकर यांनी पत्नीला जराही एकांत न दिल्याने मला संधी मिळाली नाही, असाही दावा या मॉडेलने केल्याचे समजते.
याप्रकरणी पारसकर यांची चौकशीही करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना अटकपूर्व जामीनही मंजूर करण्यात आला. केस मागे घेण्यासाठी पारसकर दबाव टाकत असल्याचा आरोप मॉडलने केला होता. त्यानंतर या मॉडेलच्या वकिलाने केसमधून माघारही घेतली होती. ही मॉडेल कशा पद्धतीनं पारसकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतेय हे सांगणारा व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला होता.