ऑनलाइन लोकमत -
बीड, दि. 11 - बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून बँकेतील अनेक आजी-माजी संचालकांना, लवकरच फरार घोषीत करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचाही समावेश असणार आहे.
आरोपपत्रात तब्बल 93 जणांची नावं आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी केली. मात्र एकही आरोपी न सापडल्याने, सर्व आरोपींना कोर्टातून फरार घोषीत करण्यात येणार आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह 93 जणांचा समावेश आहे.
अवैध कर्जवाटप आणि घोळ
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कोट्यवधी रुपयांचं विना तारण कर्ज मंजूर करणं, तसंच कागदपत्राची खातरजमा न करता कर्ज वाटप केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात अनेक नेत्यांवर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.