पुसेगाव (जि़सातारा) : सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषात बेलफुल गुलालाची उधळण करत भक्तिमय व उत्साही वातावरणात श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव शनिवारी उत्साहात झाला. यावेळी महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांमधील सुमारे ८ लाख भाविकांनी पुसेगाव सुवर्णनगरीत हजेरी लावली. मंगळवारी पहाटे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव-पाटील, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय द. जाधव, अॅड. विजयराव जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस अभिषेक, मंत्रपुष्पांजली अर्पण करून आरती करण्यात आली. त्यानंतर पहाटे फुलांनी सजवलेल्या मानाच्या रथामध्ये श्री सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते सकाळी दहाला मानाच्या रथाचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी टाळ-मृदगांच्या गजरात ढोल-ताशे व बँडपथकाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीच्या अग्रभागी गजराज आणि अश्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. दर्शनाला येणारे भाविक नारळ, बेलफुल, पुष्पहार, पेढे व नोटांच्या माळा रथावर अर्पण करीत होते. भाविकांनी श्री सेवागिरी मंदिरात संजीवन समाधीच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. मंदिर ते यात्रास्थळ (मुख्य रस्ता), पोस्ट कार्यालय मार्गे मंदिर अशी बारा ते चौदा तास रथ मिरवणूक झाली. रथयात्रा संपल्यानंतर रथावरील देणगी रक्कम पोलीस बंदोबस्तात एकत्र करून नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. (वार्ताहर) सेवागिरी रथोत्सव लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सेवागिरी महाराजांचा रथोत्सव शनिवारी पुसेगाव (ता. खटाव) येथे उत्साहात झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आमदार जयकुमार गोरे, अॅड. विजय कणसे आदी उपस्थित होते.
सेवागिरी रथोत्सवात भक्तीचा मेळा
By admin | Updated: December 21, 2014 01:34 IST