मनोज गडनीस, मुंबईप्राप्तिकराचे विवरण भरण्याची ३१ जुलै २०१४ ची मुदत हुकली, अशा विवंचनेत जर तुम्ही असाल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही विवरण ३१ मार्च २०१६ पर्यंत दाखल करू शकता़ अर्थात, तुमच्यावर करदायित्व नसेल तर प्रश्नच नाही, पण करदायित्व असेल तर तुलनात्मक दंड भरून विवरण भरता येईल.प्राप्तिकराच्या विवरणासाठी ३१ जुलैची मुदत असल्याने विभागाची कार्यालये व ई-रिटर्न अशा दोन्ही पद्धतीने भरणा करण्यासाठी करदात्यांची लगबग उडाली होती. मात्र, ज्या लोकांनी अद्यापही विवरण भरले नाही, त्यांच्यापुढे असलेल्या पर्यायांची 'लोकमत'ने चाचपणी केली. ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट दीपक टिकेकर यांनी सांगितले की, काही कारणाने जर विवरणपत्र मुदतीत दाखल झाले नाही तरी नंतरच्या काळात ते दाखल करता येते. मुदतीनंतर मागील दोन आर्थिक वर्षांची विवरणपत्रे दाखल करण्याची मुभा करदात्यांना असते. त्यामुळे या वर्षी ज्यांची विवरणपत्रे भरणे बाकी राहिली, त्यांना ३१ मार्च २०१६ पर्यंत ती भरण्याची संधी उपलब्ध आहे. या संधीची उकल करताना ते म्हणाले की, यात दोन प्रकार आहेत. ज्यांना करदायित्व नाही, त्यांना ३१ मार्च २०१५ पर्यंत कोणत्याही दंडाशिवाय विवरण भरता येईल. पण, ज्यांना करदायित्व आहे, अशा लोकांना त्यांच्यावर आकारणी झालेल्या कराच्या एक टक्का रक्कम प्रतिमाह व त्या एकूण रकमेवर एक टक्का या दराने दंड भरून विवरण दाखल करता येईल. तर, १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ पर्यंतही विवरण दाखल करणे शक्य असून त्या वर्षात विवरण दाखल करणाऱ्या लोकांना करदायित्व असो वा नसो, पाच हजार रुपयांचा दंड भरून विवरण दाखल करता येईल.
३१ मार्च २०१६ पर्यंत भरा प्राप्तिकराचे विवरण!
By admin | Updated: August 2, 2014 09:40 IST