मुंबई : काळबादेवी येथील आगीच्या दुर्घटनेत ९० टक्के जखमी झाल्यानंतरही त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अनेक महत्त्वाच्या मोहिमा फत्ते करणारे साहेब या संकटातूनही बचावतील, अशी जवानांना आशा वाटत होती. परंतु गेले सहा दिवस मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज आज अखेर संपली. अग्निशमन दलाचे उप प्रमुख अधिकारी सुधीर अमिन (वय ४९ वर्षे) यांनी ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात आज अखेरचा श्वास घेतला. एका दुर्घटनेत प्रमुख अधिकाऱ्यांची फळीच कोसळल्यामुळे अग्निशमन दलावर शोककळा पसरली आहे.गेल्या शनिवारी काळबादेवी येथील चार मजली गोकूळ निवास इमारतीला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर आणि उप प्रमुख अधिकारी सुधीर अमिन गंभीर जखमी झाले. नेसरीकर आणि अमिन यांना बाहेर काढल्यानंतर संपूर्ण गोकूळ निवास कोसळली. दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ ऐरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र अमिन यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. १९८९मध्ये अमिन अग्निशमन दलामध्ये रुजू झाले. भायखळा, चेंबूर, वांद्रे आणि सायन या अग्निशमन केंद्रांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केले होते. १ नोव्हेंबर २०१३ रोजी विभागीय अधिकारी असलेले अमिन यांना उप प्रमुख अग्निशमन अधिकारी या पदावर बढती मिळाली़ मात्र यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लावला. या दुर्घटनेनंतर पालिका महासभेने सोमवारी घाईघाईने बढतीचा प्रस्ताव मंजूर केला. मात्र हा आनंद साजरा करण्यापूर्वीच अमिन यांनी या जगाचा निरोप घेतला. (प्रतिनिधी)
उपप्रमुख अधिकारी सुधीर अमिन शहीद
By admin | Updated: May 15, 2015 04:51 IST