मोहोपाडा : रसायनी पाताळगंगा परिसरात ३५ ते ४० छोटेमोठे कारखाने आजही सुरू आहेत. २०२० पर्यंत राज्यातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून रसायनी-पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राची ओळख निर्माण होणार आहे. या परिसरात जवळपास २०० कारखान्यांना मंजुरी मिळाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यातील काही कारखान्यांचे काम सुरू झाले आहे. यामुळे पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. एमआयडीसी क्षेत्राबरोबरच वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी काही गावांना पाणीसमस्येची झळ लागली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच शशिकांत मुकादम यांच्यासह एमआयडीसी अधिकारी यांची मुंबई विधानसभा सचिवालयात बैठक पार पडली. यावेळी मंत्री सुभाष देसाई, आमदार मनोहर भोईर, आमदार भरत गोगावले आदी उपस्थित होते. बैठकीत पाणीप्रश्न व पाणीपट्टी थकबाकीवर चर्चा करण्यात आली. सरपंच शशिकांत मुकादम यांनी पाणीप्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर, आळी आंबिवली व रिसवाडी या गावांना नवीन नळजोडणी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी एमआायडीसी अधिकाऱ्यांनी मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे ३० कोटी पाणीपट्टी थकबाकी असून, यातून निव्वळ सहा कोटी असल्याचे स्पष्ट केले. यावर सरपंच मुकादम यांनी महिना ५० हजार रुपये भरण्याची तयारी दाखविली. अखेर चर्चेअंती योग्य तोडगा न निघाल्याने निर्णय होऊ शकला नसल्याचे सरपंच शशिकांत मुकादम यांनी बोलताना सांगितले.
मोहोपाड्यात पाणीप्रश्नावर उपाययोजनेची मागणी
By admin | Updated: August 1, 2016 02:52 IST