पिंपरी : प्राईड पर्पल प्रॉपर्टीज या बांधकाम व्यावसायिकाचे बालेवाडी येथे चालू असलेल्या इमारतीच्या १३व्या मजल्यावरील स्लॅब कोसळून ९ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला आहे. या व्यावसायिकाचे वाकड व चऱ्होली येथेही बांधकामे सुरू असून, या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे. याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बालेवाडी येथील दुर्घटनेत बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीमुळे या मजुरांचा नाहक बळी गेला आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अरविंद जैन यांच्या मालकीचे प्राईड पर्पल प्रॉपर्टीज ग्रुप हे वाकड व चऱ्होली येथे मोठ्या प्रमाणावर बांधकाम करीत असून, सदरच्या बांधकाम व्यावसायिकाने अवैध बांधकामदेखील केलेले असल्याचा आरोप बारणे यांनी केला आहे. या बांधकाम व्यावसायिकांना राजकीय नेत्यांचे मोठे पाठबळ असल्याचा आरोपही बारणे यांनी केला आहे. व्यावसायिकाविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी बारणे यांनी केली आहे. (वार्ताहर)>वाकड येथे स्थानिक नगरसेवकांनी चुकीच्या पद्धतीने ठराव करून महापालिका उद्यानाच्या आरक्षणातून या व्यावसायिकाला रस्ता मिळावा व या रस्त्यामुळे या व्यावसायिकाला २२ मजली बांधकाम करता यावे, अशा प्रकारचा चुकीचा प्रस्ताव करून महापालिका सभेकडे पाठविला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘त्या’ बांधकामांची चौकशी करण्याची मागणी
By admin | Updated: July 31, 2016 01:27 IST