मुंबई : भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यास उशिर केल्याबद्दल नवघर पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे. पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.नवघर पोलीस ठाण्याचे निरिक्षक संपत मुंढे यांना मारहाण करून त्यांना शासकीय कर्तव्यापासून परावृत्त करणे, धमकावणे, दमदाटी करणे याबद्दल सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. २१ आॅगस्टला मुंढेंनी भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. एका गुन्हयात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होती. तेव्हा सोमय्या पोलीस ठाण्यात आले. त्यांनी मारहाण, धक्काबुक्की केली. कार्यकर्त्यांकरवी व्हिडीओ शुटींग करून बघून घेतो, अशी धमकी दिली. विशेष म्हणजे कायदेशीर कारवाई सुरू असलेल्या आरोपीला त्यांनी आपल्यासोबत नेले, अशी तक्रार मुंढे यांनी केली होती. नवघर पोलिसांनी मात्र सोमय्याविरोधात गुन्हा न नोंदवता फक्त घटनेचा उल्लेख स्टेशन डायरीत केला होता. हा प्रकार मारिया यांना समजल्यानंतर त्यांनी अप्पर आयुक्त छेरींग दोरजे, उपायुक्त विनय राठोड यांना घटनेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर २४ आॅगस्टला सोमय्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी सोमय्यांविरोधात एफआयआर का नोंदला नाही, वरिष्ठ अधिकाऱ्याने नवघर पोलिसांवर दबाव आणला होता का, हे शोधण्यासाठी मुलुंड विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. उपायुक्त राठोड, वरिष्ठ निरीक्षक गणेश गायकवाड यांनी असा प्रकार घडला नसल्याचे तेव्हा पत्रकारांनी विचारले तेव्हा सांगितले होते. त्यामुळे या दोघांवर संशयाची सुई असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
किरीट सोमय्यांवर गुन्हा नोंदविण्यास विलंब
By admin | Updated: August 28, 2014 03:25 IST