देहूगाव : देहूगाव येथील पाणीपुरवठा योजना हस्तांतरणाबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायत यांच्यात निर्माण झालेला पेचावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि. ६) दुपारी साडेचारला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एन. एन. भोई यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला बैठकीबाबत कळविले असून बैठकीत नेमका काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देहूगावला गेल्या ४०-४५ वर्षांपासून जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र,पाणी बिल वसूल होत नाही, यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ सहकार्य करीत नाहीत अशी तक्रार जीवन प्राधिकरणची होती. त्यामुळे ही योजना दुरुस्ती-देखभालीसाठी परवडत नसल्याचे कारण देत ती हस्तांतरीत करून घ्यावी, असा तगादा प्राधिकरणने ग्रामपंचायतीकडे लावला. ही योजना सध्याच्या लोकसंख्येला पुरेशी नसून या योजनेवर ताण येत आहे. जलवाहिन्या सर्वत्र टाकण्यात आलेल्या नाहीत. दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो, नळजोड बंद असूनही त्यांना बिले येतात, अशा कारणांनी नागरिक बिल भरत नाहीत. दोन वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांच्या माध्यमातून नऊ कोटीच्या योजनेचे काम सुरू आहे. ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू करून द्यावी व ग्रामसभेचा ठराव घेऊन ही योजना ताब्यात घ्यायची किंवा नाही याचा निर्णय घेऊ असे ग्रामपंचायतने कळविले होते. यावर प्राधिकरणने आक्षेप खोडून काढत योजना ताब्यात घेण्यासाठी दहा वेळा पत्रव्यवहार केला होता. (वार्ताहर)>जानेवारी महिन्यात योजना हस्तांतरणाबाबत ग्रामपंचायत व जीवन प्राधिकरण अधिकारी यांच्यात चर्चा झाली होती. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनंतर निर्णय घ्यावा, असे ठरले होते. मात्र, प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने प्राधिकरणाने ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा एकतर्फी बंद केला होता. यामुळे देहूकरांचे हाल झाले होते.
देहू पाणी योजनाप्रश्नी आज बैठकीत तोडगा?
By admin | Updated: March 6, 2017 01:16 IST