सीपी जाणार नवी मुंबईला : ‘रिप्लेसमेंट‘साठी लगबग नागपूर : राज्य पोलीस दलातील वरिष्ठांच्या बदल्यांची यादी जवळपास निश्चित झाली आहे. नागपूरसह दोनएक ठिकाणच्या ‘रिप्लेसमेंट‘साठी लगबग सुरू असून, त्यावर निर्णय होताच बदल्यांचे आदेश जारी केले जाणार आहे. विशेष म्हणजे, बदल्यांची ही यादी अनेकांसाठी ‘दे धक्का‘ ठरणार असल्याचे खास सूत्रांचे सांगणे आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या (अधीक्षक आणि त्यावरच्या दर्जाचे अधिकारी) बदल्यांचा घोळ गेल्या दोन वर्षांपासून पोलीस दलासाठी मनस्तापाचा विषय ठरला आहे.चंद्रपूरसाठी दे धक्का नागपुरात सध्या चर्चेचा विषय ठरलेले पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांचीही बदली झाल्याची नागपूरपासून मुंबईपर्यंत चर्चा आहे. राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय घेतला. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अभिनाश कुमार यांना चंद्रपूरचे अधीक्षक म्हणून नियुक्त केले जाणार असल्याचे सांगितले जाते तर, पुण्याचे अधीक्षक म्हणून सुवेज हक यांना नियुक्त केले जाणार असल्याची माहिती आहे. नेतेमंडळींचा ‘प्रेस्टीज इश्यू’विशिष्ट पोलीस अधिकाऱ्यांसाठी काही ठिकाणच्या नेते मंडळींनी ‘प्रेस्टीज इश्यू‘ केल्यामुळे यादी वारंवार बदलत गेली. त्यामुळे सलग दोन वर्षे अनेक पोलीस अधिकाऱ्यांना प्रचंड मनस्ताप झाला. नक्षलग्रस्त गडचिरोलीत जबरदस्त कामगिरी बजावूनही सुवेज हक यांना ‘पालघर‘ला पाठविण्यात आले. त्यांच्यासारख्याच चार ते पाच अधिकाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना वर्षभरापासून पोलीस दलात खदखदत होती. गृहखात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भावना लक्षात घेत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळला. या पार्श्वभूमीवर, यंदा जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यांपासूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी चर्चेला आली. त्यात मुख्यमंत्र्यांचे गृहनगर असलेल्या नागपूरचे पोलीस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त अनुपकुमार सिंह आणि उपायुक्त श्रीप्रकाश वाघमारे यांचाही समावेश होता. खास सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त पाठक यांची नवी मुंबईचे सीपी म्हणून नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. ऐनवेळी महत्वपूर्ण घडामोड झाली तर त्यांना ठाण्याचे आयुक्त म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. प्रमोशनचा पर्याय नागपूरचे आयुक्त म्हणून रश्मी शुक्ला, कनकरत्नम आणि विपीन बिहारी यांना ‘आॅफर‘ देण्यात आली आहे. मात्र, तिघांनीही नागपुरात येण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे ‘प्रमोशन‘चा पर्याय पुढे आला आहे. कारण नागपूरचे पोलीस आयुक्तपद अतिरिक्त महासंचालक दर्जाचे (एडीजी) आहे. राज्यात तीन एडीजींची पदे रिक्त होत असून, सात जणांची नावे प्रमोशनच्या यादीत आहे. सेवाज्येष्ठतेनुसार डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे नाव सातव्या स्थानावर असल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. येथील सहआयुक्त अनुपकुमार यांना मुंबई किंवा पुण्यातच पाठविण्यात येऊ शकते. त्यांच्या जागी विनीत अग्रवाल यांचे नाव जवळपास पक्के झाले आहे. अग्रवाल सध्या प्रतिनियुक्तीवर गृहमंत्रालयात विशेष सचिव आहेत. (प्रतिनिधी)
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी निश्चित
By admin | Updated: February 8, 2015 01:13 IST