कोपरगाव (अहमदनगर) : माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याने आमचा पराभव झाला़ बारामतीत आमचेच लोक आम्हाला विजयी करतात आणि पराभूतही, अशी सारवासारव माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.कोळपेवाडी येथे कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास आलेल्या पवारांनी पत्रकारांशी बोलताना मी पराभवाने खचणारा आणि विजयाने हुरळून जाणारा कार्यकर्ता नाही, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस कधी सरकारच्या बाजूने असते तर कधी विरोधात़ त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिर्डीत रविवारी केले होते. त्यावर पवार म्हणाले, उगाच विरोधाला विरोध करण्याची आमच्या पक्षाची भूमिका नाही़ कायदा-सुव्यवस्था आणि उसाच्या प्रश्नावर आम्ही आक्रमक झालो आहोत़ जेथे जेथे सरकार चुकेल, त्या त्या वेळी आम्ही आक्रमक होतो व यापुढेही तशीच भूमिका राहील.नांदेडमध्ये महापालिकेत प्रथम एमआयएम या पक्षाला बऱ्यापैकी यश मिळाले़ त्यानंतर विधानसभेत त्यांचे दोन आमदार निवडून आले़ आता वांद्रे येथे एमआयएम नशीब अजमावत आहे़ परंतु सर्वधर्मसमभावाची भावना घेऊन समविचारी पक्ष एकत्र आले तर ते पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल, असेही पवार म्हणाले़ (प्रतिनिधी)
‘क्रॉस व्होटिंग’मुळे कारखान्यात पराभव
By admin | Updated: April 7, 2015 04:21 IST