मुंबई : शिवसेना-भाजपा महायुतीमधील चार घटकपक्षांना केवळ सात जागा सोडण्याचा प्रस्ताव शिवसेनेने दिल्याने हे पक्ष कमालीचे नाराज झाले आहेत़ त्यामुळे आता ही महायुती टिकविण्यास शिवसेनेने आपल्या ‘मिशन १५०’चा हट्ट सोडावा, असा आग्रह भाजपाने धरला आहे़ तर भाजपाने १३० जागांचा दुराग्रह सोडावा, असे सेनेचे म्हणणे आहे़ परिणामी पुन्हा महायुतीवरील फुटीचे सावट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे़ दरम्यान, महायुतीतील घटकपक्षांचे समाधान करा तरच आम्ही महायुतीत राहू, असा इशारा भाजपाने सेनेला दिल्याचे समजते़ आठ दिवस चाललेल्या चर्चेनंतरही युती तुटण्याचीच शक्यता होती. काही हितसंबंधी मंडळींनी केलेल्या ‘मध्यस्थी’मुळे चर्चेची कोंडी फुटली. मंगळवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना दूरध्वनी करून युतीच्या जागावाटपाच्या नव्या फॉर्म्युलावर चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार शेलार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासोबत नार्वेकर, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट झाली. दादर येथे भाजपाने आपल्या पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये महायुतीचा फैसला होणार होता. तावडे व शेलार हे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, अनिल देसाई, राऊत व नार्वेकर यांना घेऊन दादर येथील पक्ष कार्यालयात दाखल झाले. तेथे त्यांची ओम माथूर व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. तीत फॉर्म्युला हा भाजपाला मनपसंत जागा देऊन मित्रपक्षांच्या जागांवर घाला घालणारा होता. त्याचेच पडसाद रात्रीच्या बैठकीत उमटले व महायुतीबाबतची अनिश्चितता पुन्हा निर्माण झाली़ विनोद तावडे, आशिष शेलार तसेच अमरावतील पदवीधर व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सदस्य रणजीत पाटील व प्रवीण पोटे-पाटील हे विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत. विधान परिषदेच्या या रिक्त होणाऱ्या जागा तसेच काही महामंडळांवरील नियुक्त्या मित्रपक्षांना देऊन त्यांची समजूत काढण्याचा शिवसेना-भाजपा नेत्यांचा प्रयत्नही अयशस्वी झाल्याचे समजते़
महायुतीचे ‘घट’ बसेनात
By admin | Updated: September 24, 2014 16:44 IST