मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर उर्फ साध्वी व लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार आहे. या निर्णयाकडे तपास यंत्रणांसह सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.एप्रिल २०१६ मध्ये एनआयएने साध्वीला क्लीनचीट देत आरोपींवरील ‘मकोका’ हटवला. त्यानंतर साध्वीने विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र विशोष न्यायालयाने तिच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत, असे म्हणत तिचा जामीन अर्ज फेटाळला. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला साध्वीने उच्च न्यायालयात आव्हान दिले.बॉम्बस्फोटात वापरलेली मोटारसायकल आपली असली तरी ती दुसऱ्याला विकण्यात आल्याचा दावा साध्वीने उच्च न्यायालयात केला आहे. साध्वी आजारी असल्याने तिचा जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती साध्वीच्या वकिलांनी न्यायालायाला केली.साध्वीच्या जामीन अर्जावर एनआयएनेही आक्षेप घेतलेला नाही. ‘साध्वीविरुद्ध पुरावे नसल्याने व काही आरोपींनी त्यांचा जबाब फिरवल्याने तिच्याविरुद्ध परिावे नाहीत,’ असा युक्तिवाद एनआयने खंडपीठापुढे केला होता.साध्वीपाठोपाठ लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितनेही उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. युएपीएची सुधारित तरतूद पूर्वलक्षित प्रभावाने लागू केली जाऊ शकत नाही. तसेच या तरतुदीनुसार युएपीए लागू करण्यासाठी विशेष समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे. मात्र जानेवारी २००९ मध्येही समितीच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे सुधारित तरतुदींनुसार पुरोहितला जामीन नाकारणे बेकायदा आहे, असे पुोहितने याचिकेत म्हटले आहे. मात्र पुरोहितच्या जामीन अर्जावर एनआयएने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही अर्जांशिवाय न्यायालय एनआयए की एटीएसने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानुसार पुढील खटला चालवयाचा, याबाबतही निर्णय घेण्याची शक्यता आहे. या सर्व मुद्यांवर उच्च न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये निकाल राखून ठेवला होता. (प्रतिनिधी)
साध्वी, पुरोहितच्या जामीन अर्जावर आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 02:40 IST