मुंबई : बदल्यांच्या निमित्ताने मंत्रलयातील भ्रष्टाचार आणि ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांना चाप बसणार आहे. बदल्यांचे अधिकार आता मंत्रलयातून विभागीय स्तरावर विकेंद्रित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतला. मुख्यमंत्र्यांकडील जलसंपदा, अन्न व औषध प्रशासन विभागातून याची सुरुवात होणार आहे.
जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या बदलीचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे होते, ते आता विभागाच्या प्रधान सचिवांकडे देण्यात येतील. तर उप अभियंत्यांच्या बदल्यांचे अधिकार जलसंपदा मंत्र्यांकडून मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत. शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, श्रेणी-2 गट ब मधील कर्मचा:यांच्या बदल्या मुख्य अभियंत्यांच्या सल्ल्याने अधीक्षक अभियंता करतील. पूर्वी हे अधिकार जलसंपदा राज्यमंत्र्यांकडे होते. अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, वैज्ञानिक अधिकारी, अन्नसुरक्षा अधिकारी, प्रशासकीय अधिका:यांच्या बदल्यांचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. यापूर्वी हे अधिकार मंत्र्यांकडे होते. या विकेंद्रीकरणामुळे प्रशासनात पारदर्शकता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
स्वत:कडील खात्यांमध्ये बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. या निर्णयामुळे मंत्रलयातील ‘भेटीगाठी संस्कृती’ला आळा बसेल, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे.