नाशिक : महापालिकेच्या पांडवलेणीजवळील खत प्रकल्पावर कचरावेचक महिलेसह तिच्या आठ वर्षांच्या भाचीचा कचऱ्याचा ढिगारा कोसळून त्याखाली दबून बुधवारी मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ढिगारा उपसून मावशी-भाचीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दुर्घटनेमुळे खत प्रकल्पावरील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. येथील खत प्रकल्पावर रोज शेकडो टन कचरा वाहून आणला जात असतो. त्याचे मोठे ढिगारे साचलेले आहेत. सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून अनेक कचरावेचक येथे येतात. बुधवारी पहाटे कवटेकरवाडी वस्तीतील काही महिला कचऱ्यातील साहित्य वेचण्यासाठी खत प्रकल्पावर गेल्या. त्यांच्यासोबत लहान मुलेही होती. कचरा गोळा करताना सुमारे पन्नास फूट उंचीच्या एका ढिगाऱ्याचा काही भाग अचानक कोसळला. त्यात एक महिला व दहा वर्षांची मुलगी गाडली गेल्याचे काही युवकांनी शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख सुदाम डेमसे यांना सांगितले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस आले तेव्हा खत प्रकल्पावरील कर्मचाऱ्यांना दुर्घटनेची माहिती नव्हती. त्यानंतर शोधमोहीम सुरू झाली. गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ढिगाऱ्याखाली गाडली गेलेल्या पूनम बाळू माळी (४०) या मृतावस्थेत सापडल्या. त्यानंतर कोमल बाळासाहेब माळी (८) हिचा मृतदेह सापडला. (प्रतिनिधी)
कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मावशी-भाचीचा मृत्यू
By admin | Updated: April 29, 2016 06:17 IST