ऑनलाइन लोकमतबीड, दि. २१ : हाबडा फेम आमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची ओळख होती, त्या बाबुराव आडसकरांना मात्र अद्यापही आपल्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती नाही. त्यांची प्रकृती आगोदरच खालावलेली असल्याने आणि अंथूरणावर ते पडूनच असल्याने त्यांना कुटुंबियांनी मेघराज यांच्या आत्महत्येची माहितीच दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या आडस येथील वाड्यावरही या घटनेचा आक्रोश दबक्या आवाजात होताना दिसत आहे. बाबुराव आडसकर हे केज आणि चौसाळा मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले होते तर एक वेळ ते विधानपरिषदेवरही निवडून गेले होते. तीन वेळा आमदार राहिलेल्या आडसकर यांनी वयाची ९५ वर्षे ओलांडली असून आता ते थकले आहेत. दिवसभर ते त्यांच्या बेडरूममध्येच पडून असतात. कोणी भेटायला आले तर ते आजही त्याच्याशी गप्पा मारतात परंतु अंथूरणावर बसूनच.मेघराज यांच्या आत्महत्येच वृत्त त्यांना समजले तर त्याचा त्यांना त्रास होईल, या भीतीपोटी कुटुंबातील लोक आणि कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्यापासून ही घटना दडवून ठेवली आहे. आत्महत्येचे वृत्त समजताच कार्यकर्ते आणि आडसकर कुटुंबावर प्रेम करणाऱ्या लोकांची गर्दी आडसकरांच्या वाड्यावर होत असली तरी त्यांना बाबुराव यांच्याकडे जाऊ दिले जात नाही. घरातील महिलांचा आक्रोश होतोय पण तरीही त्यांच्यापर्यंत आवाज पोहचू नये, याची काळजीही घेतली जात आहे. मेघराज यांचे भाऊ आणि भाजपाचे नेते रमेश आडसकर हे दिल्लीला असून ते तेथून निघाले आहेत. रात्री बारा वाजेपर्यंत ते आडसला पोहचतील, असे सांगण्यात येत आहे. आडसच्या वाड्यासमोर एक फलक लावण्यात आला असून यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे लिहिण्यात आले आहे.
डीसीसी घोटाळा प्रकरण ; पित्याला माहितीच नाही मुलाच्या आत्हत्येची घटना !
By admin | Updated: July 21, 2016 19:09 IST