मुंबई : लेखिका शोभा डे यांनी तब्येतीवरून खिल्ली उडवलेले मध्य प्रदेशचे पोलीस दौलतराम जोगावत यांच्यावर गुरुवारी पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील प्रसिद्ध सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली.दौलतराम यांच्यावर तब्बल दीड तास लेप्रोस्कोपिक बँडेड रुक्स गॅस्ट्रीक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर जोगावत यांना वॉर्डमध्ये हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. येत्या दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती डॉ. लकडावाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. १९९३ पर्यंत जोगावत यांची प्रकृती सर्वसाधारण होती, पण पित्ताशयाचा आजार बळावल्याने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढले आणि वजन वाढल्याचे निदान झाले होते.दौलतराम यांचे सध्या वजन १८० किलो असून, उपचार करून ८० ते १०० किलोच्या आसपास आणण्याचे डॉक्टरांचे लक्ष्य आहे. यासाठी दीड वर्ष उपचार घ्यावे लागणार आहेत. डॉ. लकडावाला हे दौलतराम यांच्यासोबतच जगातली सर्वात लठ्ठ महिला असलेल्या इमानवरही उपचार करत आहेत. (प्रतिनिधी)>लेखिका शोभा डे यांनी टिष्ट्वटरवरून दौलतराम यांच्या लठ्ठपणाची खिल्ली उडवल्यानंतर ते पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. यानंतर त्यांनी आपले वजन कमी करण्याचा निर्णय घेऊन उपचारांसाठी मुंबईत दाखल झाले. त्यांच्यावर सध्या डॉ. लकडावालांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. गुरुवारी डॉ. लकडावाला आणि त्यांच्या चमूने पहिली शस्त्रक्रिया केली.
दौलतराम जोगावत यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया यशस्वी
By admin | Updated: March 4, 2017 05:28 IST