औरंगाबाद : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वंजारी समाजाचे आराध्यदैवत असलेल्या भगवानगडावर यंदाच्या दसरामेळाव्यावरून वाद होण्याची चिन्हे आहेत. यापुढे गडावर राजकीय मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी भूमिका गडाच्या ट्रस्टींनी घेतली असताना दुसरीकडे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मेळाव्यास विरोध केला तर त्यांना गादी सोडावी लागेल, असा इशारा पंकजा समर्थकांनी दिला आहे.१९५८ पासून भगवानगडावर दसरा मेळाव्याची परंपरा आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या कन्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या मेळाव्याची परंपरा सक्षमपणे चालवीत आहेत. परंतु राजकीय मेळावा म्हणून त्यामध्ये महंत खोडा घालत आहेत. यंदाच्या दसरा मेळाव्यात पंकजा यांचे भाषण होणारच. समाजाचा निर्णय मान्य नसेल तर महंत नामदेव शास्त्री यांनी गादी सोडावी, अशी मागणीही लावून धरली जाणार असल्याचे दसरा मेळावा कृती समितीचे अध्यक्ष उद्धव ढाकणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ढाकणे म्हणाले, गड परिसरातील ६० ग्रामपंचायतींनी पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनपर भाषणाला सहमती दर्शविली आहे. गडावर मेळावा घेण्याची पूर्ण तयारी झालेली असून, राज्यातील सर्व समाजबांधव यानिमित्ताने एकत्र येणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रात २०० ग्रामपंचायतींनी ठराव घेतले आहेत. गड हा समाजासाठी आहे. त्यामुळे समाजाचा निर्णय महंत शास्त्रींना मान्य नसेल तर त्यांनी गादी सोडली पाहिजे. बाळासाहेब चौधर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा खंडित होऊ देणार नाही. त्यामुळे यंदाही दसरा मेळावा गडावर होईल. त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळेल. अभिषेक बडे म्हणाले, गडावर मेळावा व्हावा म्हणून २९ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा महंतांना विनंती केली जाणार आहे. पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष सविता घुले, इंदुमती आघाव आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)नेमका काय आहे वाद.. - महंत नामदेव शास्त्री हे २००३ पासून गडाच्या गादीवर आहेत. सुरुवातीपासूनच त्यांना विरोध होता; परंतु गोपीनाथ मुंडे यांनी मध्यस्थी केल्याने तो वाद मिटला होता. सद्य:स्थितीत गडावर मेळावा घेण्याऐवजी गडाच्या पायथ्याला मेळावा घ्यावा. गडावर फक्त धार्मिक कार्यक्रम व्हावेत, अशी महंत शास्त्री यांची भूमिका आहे. महिला आयोगाकडे दाद- दसरा मेळाव्याचे नेतृत्व पंकजा मुंडे करीत आहेत. एक महिला नेतृत्व करीत असल्यामुळे महंतांकडून विरोध होत असल्याचे दिसते. पंकजा या भगवानगडाच्या कन्या असून, त्यांच्यावरच बंधने घातली जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांचे गडावर भाषण होणार आहे. याविषयी महिला आयोगाकडे दाद मागणार आहोत, असे सविता घुले यांनी सांगितले. महंतांनी महिलांना कमी लेखू नये, असे इंदूमती आघाव म्हणाल्या.
भगवानगडावरील दसरामेळावा वादात
By admin | Updated: September 27, 2016 02:18 IST