अकोला : वाशिम येथील सामान्य रुग्णालयात केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने आठ वृद्धांना दृष्टी गमवावी लागल्याची खळबळजनक घटना वाशिम येथे घडली. या सर्व रुग्णांना शुक्रवारी तातडीने अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. नेत्ररोग तज्ज्ञांनी तपासणी केल्यानंतर या रुग्णांना मुंबईला रवाना करण्यात आले आहे. वाशिमच्या सामान्य रुग्णालयात १५ आॅक्टोबर रोजी २२हून जास्त रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णांना घरी पाठविण्यात आले. मात्र घरी आल्यावर त्यांच्या डोळ्यांमध्ये जळजळ होऊ लागली आणि काही दिसनासे झाले. त्यामुळे आठ रुग्णांनी १७ आॅक्टोबर रोजी सामान्य रुग्णालयात धाव घेतली. परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकत सर्व आठही रुग्णांना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले. सर्व रुग्णांची तपासणी केल्यानंतर वाशिम येथे व्यवस्थित शस्त्रक्रिया न झाल्याने त्यांना त्रास सुरू झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली. रुग्णांची नाजूक स्थिती पाहता, डॉ. कार्यकर्ते यांनी आठही रुग्णांना मुंबई येथील रुग्णालयात रवाना केले.
चुकीच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे आयुष्यात अंधार!
By admin | Updated: October 31, 2015 08:22 IST