मुंबई : रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेडच्या (आरजीपीपीएल) दाभोळ वीज प्रकल्पातील महागडी वीज खरेदी न करण्यावर ठाम राहत राज्य शासनाच्या अखत्यारितील महावितरण कंपनीने या कंपनीबरोबरचा वीज खरेदी करार संपुष्टात आणण्याची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय ऊर्जा व कोळसा मंत्री पीयूष गोयल, वित्तीय संस्था, आरजीपीपीएल, एनटीपीसी व गेल इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी दाभोळच्या वीज प्रकल्पाबाबत चर्चा केली. या प्रकल्पातून प्रति युनिट ५.५० रु. दराने वीज घ्यावी, अशी आरजीपीपीएलची भूमिका आहे. महाजेनकोच्या विजेचा दर ३.३० रु.असताना व आमचा सरासरी खरेदी दर ४ रु. असताना दाभोळमधून इतकी महाग वीज घेण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. या प्रकल्पातील वीज अन्य राज्यांना विकण्याचा करार करण्यास आमचा आक्षेप नसेल, असे महाराष्ट्राने केंद्र सरकारला स्पष्टपणे कळविले आहे. (विशेष प्रतिनिधी)
दाभोळ वीजकरार रद्द!
By admin | Updated: February 13, 2015 02:02 IST