डी. एस. कुलकर्णी, मकरंद अनासपुरे यांच्यासह दिग्गजांनी साधला संवाद
कोल्हापूर : ध्येयवेडे व्हा. पैसा जरुर कमवा, मात्र समाजासाठी देखील योगदान द्या. नोकरी अथवा व्यवसाय करा, पण त्यात उत्कृष्ट बना. कष्टाला लाजू नका,असे प्रेरणादायी सल्ला देत उद्योग-व्यवसाय, चित्रपट, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी रविवारी केआयटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयाच्या ‘वॉक विथ वर्ल्ड’ आयोजित ‘अभिग्यान २०१७’ मध्ये उद्योगपती डी. एस. कुलकर्णी, चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे, उद्योजक मिलिंद कांबळे, व्यंकटेश अय्यर, सामाजिक कार्यकर्ते संजय नहर या दिग्गज मार्गदर्शकांच्या यशकथांतून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली.
येथील श्री शाहू सांस्कृतिक मंदिरात सकाळी दहा वाजता उद्योजक व्यंकटेश अय्यर यांच्या हस्ते ‘अभिग्यान’ इंटरनॅशनल स्टुडंट कॉन्फरन्स या व्याख्यानमालेचे उदघाटन झाले. यावेळी उद्योजक अय्यर म्हणाले, भारतीय लोक देशी खाद्यपदार्थांनाच अधिक पसंती देतात ते ओळखून ‘गोली वडा’ ची सुरूवात केली. या व्यवसायात अनेक अडचणींना सामोरे जात यशस्वी ठरलो. कोणताही व्यवसाय करा, मात्र त्यात गुणवत्ता राखा, अनावश्यकपणा टाळा. समोर येणाºया आव्हांनाना धाडसाने सामोरे जा. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. अभिनेते अनासपुरे म्हणाले, भ्रष्टाचार, जातीयवादातून आपण बाहेर पडले पाहिजे अन्यथा आपल्या आपल्याच यादवी होवून आपण संपून जावू. आजच्या तरुणाईने रिल हिरो आणि रियल हिरोतील फरक समजून घेण्याची गरज आहे. शेतकरी, सामाजिक व्यवस्था आदींसह प्रत्येक गोष्टीकडे आपण चांगुलपणा, समंजसपणा, बारकाईने बघितले पाहिजे. सकारात्मकतेचे साखळी सुरू ठेवावी. तरुणांनी ठरविले,तरच मोठा बदल घडू शकतो, कारण त्यांच्यात मोठी ऊर्जा आहे. सण-उत्सवांना बाजारीरुप आणून त्यात रममाण होणे टाळावे. ध्येयवेड्या लोकांचा आदर्श घ्या. आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे, मात्र तो किती कमवायचा हे ठरवा. आयुष्यातील काही वेळ निवांत रहा, समाजासाठी कार्यरत रहा. उद्योगपती कुलकर्णी म्हणाले, आयुष्यातील संकटांना धैर्याने सामोरे जा. आपल्या असलेल्या दोन हातांचा उपयोग नोकरीच्या विनवणीसाठी करु नका. उद्योग, व्यवयासाद्वारे या हातांची जादू दाखवा. आयुष्यात भांडण टाळा, आरोग्य जपा, सकारात्मक रहा. नोकरी अथवा व्यवसाय करा, पण त्यात उत्कृष्ट बना. कष्टाला लाजू नका. उद्योजक कांबळे म्हणाले, शिक्षण घेतानाच आयुष्यात काय करायचे हे ठरवा. पुस्तकी शिक्षणासह प्रात्यक्षिक ज्ञान घेण्यावर भर द्या. कामात सातत्य ठेवा. डिजीटल युगात उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञान, माहितीच्या स्त्रोतांचा योग्य वापर करा.