मनोज गडनीस, मुंबई सोशल मीडियाची वाढती लोकप्रियता आणि दिवसाकाठी या माध्यमावरील लोकसंख्या लक्षात घेत आता या माध्यमाकडे सायबर गुन्हेगारांनी लक्ष केंद्रित केले असून, गेल्या वर्षभरात लहान-मोठ्या अशा तब्बल ४० हजार घटनांतून लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचे दिसून आले आहे. इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या असोसिएशनने नुकत्यात प्रसिद्ध केलेल्या ‘इंटरनेट सिक्युरिटी थ्रेट’च्या ताज्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. सोशल मीडियावरून झालेल्या आर्थिक फसवणुकीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून, भारताचा क्रमांक दुसरा ठरला आहे. आजच्या घडीला भारतात १२ कोटींपेक्षा जास्त लोक हे सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांवर कार्यरत आहेत. अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी थेट संवाद साधण्याच्या सुविधेमुळे आता सोशल मीडियाचा वापर मनोरंजनाच्या पलीकडे जात व्यावसायिकदृष्ट्याही मोठ्या प्रमाणावर होत आहे. नेमकी हीच मेख सायबर गुन्हेगारांनी ओळखत येथील जनतेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ‘इंटरनेट सिक्युरिटी थ्रेट’च्या अहवालातील माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी प्रामुख्याने फेसबुक, टिष्ट्वटर, लिंकेडिन अशा लोकप्रिय व्यासपीठांनाच लक्ष्य केले आहे. सोशल मीडियावरील या तिन्ही लोकप्रिय व्यासपीठांवर मोठ्या प्रमाणावर बोगस अकाउंट काढत तेथील लोकांना फसवणुकीच्या जाळ््यात ओढण्यास सुरुवात केली. यामध्ये बनावट खाती, बनावट पेजेस तयार करीत त्यावरून कधी स्पर्धा, तर कधी गुंतवणुकीच्या योजना सादर करीत ही फसवणूक केली आहे. काही वेळा तर एखाद्या गरीब, गरजू विद्यार्थ्याचा अथवा एखाद्या रुग्णाच्या मदतीचे आवाहन करीत पैसे लुबाडले गेले आहेत. सोशल मीडियावरील नव्या पोस्टचा भडिमार हा टिष्ट्वटरवरून सर्वात जास्त होत असतो. त्यामुळे या माध्यमाचा पुरेपूर वापर गुन्हेगारांनी केला असून, टिष्ट्वटरवरूनही आर्थिक मदतीच्या भावनिक आव्हानातून पैसे उकळण्यात आल्याची नोंद या अहवालात आहे. व्यावसायिक वापरासाठी प्रसिद्ध असलेल्या लिंकेडिनमध्येही सायबर गुन्हेगारांनी प्रवेश करीत बनावट कंपन्यांचे प्रोफाइल बनवत लोकांना फसविल्याचे दिसून आले आहे. फसवणुकीचा हा आकडा ७०० कोटींच्या घरात आहे. या अहवालातील माहितीनुसार, अशा वाटमारीचा फटका केवळ भारतालाच बसला नसून, ६० हजार घटनांसह अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर चीन, जपान हे देश अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. २०१३च्या तुलनेत २०१४च्या वर्षात अशा घटनांत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सोशल मीडियातून सायबर दरोडेखोरी!
By admin | Updated: May 4, 2015 02:39 IST