जिल्ह्यात ३०० पंप बंद : कंपनीच्या पंपांवर गर्दीनागपूर : नागपूरसह राज्यातील पेट्रोल पंपचालकांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. त्याअंतर्गत नागपूर शहरातील ९० पंपांसह संपूर्ण जिल्ह्यातील ३०० पेट्रोल पंप बंद होते. अनेक वाहनचालकांना पेट्रोलसाठी भटकंती करावी लागली. संप सायंकाळी ७ वाजता मागे घेतल्याची माहिती विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष हरविंदरसिंग भाटिया यांनी लोकमतला दिली. संप यशस्वी राहिल्याचे त्यांनी सांगितले. शहरात काही भागात कंपनी संचालित पंप सुरू असल्याने काहींना दिलासा मिळाला. पण या पंपांवर गाड्यांच्या मोठ्या रांगा असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला. अनेकांनी टँकफूल केली. पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या स्थानिक आणि अन्य कर रद्द करण्याच्या मागणीसाठी पंप बंद ठेवले होते. या करांमुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल ६ रुपयांनी महाग आहे. अतिरिक्त आर्थिक भार ग्राहकांना सोसावा लागतो. पेट्रोल आणि डिझेल करमुक्त करणे, संपूर्ण राज्यात एक कर आणि एकच किंमत ठेवणे तसेच अतिरिक्त कर कमी करण्याची पंपचालकांची मागणी आहे. बंदचे आवाहन महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने केले होते. बंदला नागपूर चेंबर आॅफ कॉमर्सने समर्थन दिले होते. (प्रतिनिधी)कंपनी पंपांवर ग्राहकांची गर्दीबंद आंदोलनादरम्यान नागपुरातील कंपनी संचालित पंप खुले होते. त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मेडिकल चौक, रिझर्व्ह बँक चौक, टी-पॉर्इंट आदी भागातील कंपनीच्या पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची विक्री सुरू होती. या पंपांवर ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून आली. लांब रांगांचा त्यांना सामना करावा लागला. रिझर्व्ह बँक चौकातील कंपनीच्या पंपावर काही ग्राहकांमध्ये झालेल्या मारहाणीत एक युवक रक्तबंबाळ झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे एस्सार, रिलायन्स कंपनीचे पंपचालक आंदोलनात सहभागी झाले नाहीत. रात्रपाळीत कार्यरत कर्मचाऱ्यांना बंदची माहिती नसल्याने शहरातील काही पंप सकाळपर्यंत सुरू होते. त्यानंतर बंद करण्यात आले. समस्या नव्हतीच : डीएसओजिल्हा पुरवठा अधिकारी लीलाधर वार्डेकर यांनी सांगितले की, पेट्रोल पंप बंद असल्यानंतरही ग्राहकांना त्रास झाला नाही. शहरातील कंपनीतर्फे संचालित पंपांव्यतिरिक्त बाहेरील काही पंप सुरू होते. त्या ठिकाणी ग्राहकांनी पेट्रोल आणि डिझेल खरेदी केले. रिझर्व्ह बँक चौकातील मारहाणीच्या वृत्ताची माहिती त्यांना नव्हती.
पेट्रोलसाठी ग्राहकांची भटकंती
By admin | Updated: August 12, 2014 01:09 IST