मुंबई : आणीबाणीतील मिसाबंदींना मासिक १० हजार रुपये पेन्शन देण्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून या योजनेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना वगळण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर हा निर्णय शिवसेनेला मान्य आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.सरकारचा हा निर्णय म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि त्या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान आहे. स्वातंत्र्य लढ्यात कोणतेही योगदान नसणारे आणि ब्रिटिशांची चापलूसी करणारे आता समाजात सहानुभूती मिळवण्याचा फुटकळ प्रयत्न करत आहेत. इतिहास बदलण्याचा हा घातकी डाव आहे, अशी टीका खा.चव्हाण यांनी केली आहे. तत्कालिन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणिबाणीला पाठिंबा दिला होता, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. तर बाळासाहेब ठाकरे यांनीही आणीबाणीचे केलेले समर्थन केले होते. त्यामुळे शिवसेनेला सरकारचा हा निर्णय मान्य आहे का, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.आणीबाणीत हाजी मस्तान, मिर्झा, सुकरनारायणन बखियासारखे स्मगलरही मिसाखाली तुरुंगात होते. मग अशांनाही पेन्शन देणार का, असेही मलिक म्हणाले.
मिसाबंदींना पेन्शन देण्यावरून टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 06:17 IST