मुुंबई : पोलीस निरीक्षकाला मारहाण, धक्काबुक्की आणि दमदाटी केल्याप्रकरणी भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांविरोधात मुलुंडच्या नवघर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. सोमय्यांवर लावलेली कलमे अजामीनपात्र असल्याने त्यांची अटक अटळ मानली जाते.लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपा-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. या गुन्ह्याचा तपास आणि कायदेशीर कारवाई नवघर पोलीस करीत होते. २१ आॅगस्ट रोजी या गुन्ह्यात आरोपी असलेले भाजपा कार्यकर्ते परिक्षित धुमे, विनोद खेडकर यांना नोटीस धाडून पोलिसांनी बोलावून घेतले होते. त्यानुसार दुपारी तीनला धुमे पोलीस ठाण्यात आला. त्याचवेळी सोमय्या ५ ते ६ कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात आले. मला विचारल्याशिवाय धुमेला पोलीस ठाण्यात का बोलावले, असा जाब विचारत सोमय्या यांनी पोलीस निरीक्षक संपत मुंढे यांना मारहाण केली. तसेच आरोपी धुमे याला पोलीस ठाण्यातून पळवून लावले. या घटनेनंतर परिमंडळ सातचे उपायुक्त विनय राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश गायकवाड यांच्या आदेशावरून घडल्या प्रकाराची फक्त डायरीत नोंद केली गेली, तीही सोमय्यांनी वाद घातला इतकीच. मात्र अखेर मुंडेंच्या तक्रारीवरून सोमय्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. (प्रतिनिधी)
किरीट सोमय्यांवर मारहाणीचा गुन्हा
By admin | Updated: August 26, 2014 04:25 IST