सांगली : शिवसन्मान जागर परिषदेत रविवारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले प्रक्षोभक भाषण व त्यावर लगेचच उमटलेली हिंसक प्रतिक्रिया याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यासह ४७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात डाव्या चळवळीतील अॅड. के. डी. शिंदे यांच्यासह सातजणांना अटक करण्यात आली आहे.बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने जाहीर केलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, विद्रोही साहित्य चळवळ, समता परिषद आदी संघटनांनी रविवारी येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शिवसन्मान जागर परिषद आयोजित केली होती. या परिषदेत आ. जितेंद्र आव्हाड यांचे भाषण सुरू असताना नाट्यगृहाबाहेर शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते जमा झाले. मिरज दंगलीमागे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा हात असल्याचे वक्तव्य आव्हाड यांनी करताच शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी आव्हाड यांच्या गाडीवर दगडफेक केली. आठ-दहा कार्यकर्ते नाट्यगृहातील रंगमंचावर घुसले. ते आव्हाडांच्या दिशेने हल्ला करण्यासाठी जात असताना मंचावर आणि खाली बसलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले आणि धुमश्चक्री झाली.परस्परांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीनुसार संभाजी ब्रिगेडच्या २०, तर शिवप्रतिष्ठानच्या १२ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पोलिसांकडूनही दोन्ही संघटनांच्या १५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अॅड. शिंदेच्या फिर्यादीनुसार, शिवप्रतिष्ठानच्या नितीन चौगुलेंसह आठ ते दहा अनोळखींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. भिडे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याचा जाब विचारण्यासाठी चौगुले यांनी बेकायदा जमाव जमविला. कार्यक्रम बंद पाडण्याच्या हेतूने ते घोषणा देत नाट्यगृहात आले.(प्रतिनिधी)
जितेंद्र आव्हाडांसह ४७ जणांविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: July 21, 2015 01:11 IST