मुंबई : देशात धार्मिक विभाजनाचे राजकारण सुरू आहे. त्यासाठी धार्मिक कट्टरतेला खतपाणी घातले जात आहे. एका धर्माकडून आक्रमक भूमिका मांडली की दुसऱ्या धर्माच्या नागरिकांचे आपसूकच धृवीकरण होईल, अशी खेळी भाजपा, शिवसेना आणि संघाशी संबंधित संघटनांकडून सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकर्ता बैठकीत चव्हाण बोलत होते. या वेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, मुस्लिमांचा मताधिकार काढून टाका, हिंदूंनी ५ -१० मुले जन्माला घालावी, अशी विधाने एका सुनियोजित कटाचा भाग आहे. देशातील सर्वसमावेशक विचारधारा कायम असेपर्यंत आपल्याला निरंकुश सत्ता मिळणार नाही याची जाणीव भाजपा-सेनेला आहे. त्यामुळेच देशातील धर्मनिरपेक्ष विचारधारेवर घाला घालण्याचे काम सुरू आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. धार्मिक संशयाचे वातावरण तयार करण्यासाठी सोशल मीडियातून खोटा व चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. तरुणांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न सुरू आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी संघविचारांची मंडळी घुसवली जात आहेत. भाजपा-सेनेचा हा डाव उधळून लावण्यासाठी सर्वसमावेशक व सर्वव्यापक विचारधारा अधिक मजबूत करावी लागणार असल्याचे चव्हाण यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)
देशात विभाजनाचे राजकारण सुरू
By admin | Updated: May 5, 2015 01:36 IST