- डॉ. नीरज देव -भ्रष्टाचाराने भारतीय समाजजीवनाचे सर्वांग ओरबाडून व्यापले आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण व धर्मकारण या ना त्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा मुक्त संचार पाहायला मिळतो.बरे! त्याला प्रतिष्ठाही भरपूर, लग्नाच्या बाजारात जा तिथे ‘जावईबापू तुमची वरकमाई किती?’ हा प्रश्न अगदी अदबीने विचारला जातो आणि इतरांना आमच्या जावयाची वरकमाई पगारापेक्षा जास्त आहे, हे तोऱ्यात सांगितले जाते.इतकेच कशाला, या प्रतिष्ठित भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार गंगा म्हणत, आम्ही आध्यात्मिक अधिष्ठानही प्रदान करतो. जसे त्या गंगेत धुतल्यावर पापाचे पुण्य होते, तसेच या भ्रष्टाचार गंगेत धुतल्यावर असत्यातील असत्य सत्य होऊन बाहेर पडते. मला आश्चर्य वाटले, सत्य नि ईश्वर यांना केंद्रस्थानी मानणाऱ्या आध्यात्मिक भारतात भ्रष्टाचाराला एवढी प्रतिष्ठा कशी?अन् मला अचानक लक्षात आले, याला कारण इथले तथाकथित धार्मिक वातावरण. त्यामुळे म्हणा की, देवलसीपणामुळे म्हणा, एक भावना तयार झाली, जे काही मागायचे ते देवाकडे मागावे. ही भावना केवळ धर्मभोळ्या हिंदूतच नसते, तर सर्वच धर्मोपधर्मात असते. एक शायर म्हणतो,मांगना हो जो बशीर खुदासे मांगियेजिनसे माँगनेसे शर्मिंदगी नही होतीम्हणणे शत प्रतिशत बरोबर, पण एक विचार मनांत डोकावतो, आपण परमेश्वराला सर्वव्यापी समजतो, तर मग त्याला आपल्या इच्छा वा गरजा कळू नयेत का? अन् जर त्याला त्या कळत असतील व रास्त वाटत असतील, तर तो स्वत: होऊन देणार नाही का? मग मला मागण्याची गरजच का पडावी? गालिबलाही हाच सवाल पडला होता म्हणून दिवान-ए-गालिबमध्ये तो स्वत:लाच पुसतो...गालिब न कर हुजुरपर बार बार तू अर्जजाहीर है तेरा हाल सब उनपर कहे बगैरअर्थात,गालिब ना करी तू वारंवार नवसाससांगितल्याविन त्या कळे तुझ्या मनीची आसखरेय मग नवसाचे मूल्यच राहात नाही. तुकोबा तर रोकडा सवाल करतात, नवसाने पोरे होत असतील, तर नवऱ्यांची गरजच का पडावी? ही गोष्ट कबीराने जरा अधिकच स्पष्ट केली तो गातो,कंकड पत्थर बाँधकर मस्जिद लय बनायतापर मुल्ला बाँग दे क बहिरा हुवा खुदाय?चिंटी के पद नेवर बांजे सो भी साहब सुनता है ।अंदर तेरे कपट करतनी सो भी साहब लखता है ।मुंगीच्या पायातील घुंगराचा आवाज त्याला ऐकू येतो आणि तुझ्या मनातील कपट कारस्थान त्याला कळतात. त्याला नाभीच्या देठापासून बोंबलून तू काय सांगणार? पण जिथे आमचा स्वत:वरच विश्वास नाही, तिथे तो कधी न पाहिलेल्या देवावर तरी कसा बसणार? आम्हाला वाटणार जिथे रडल्याशिवाय आई दूध देत नाही, तर मागितल्याविना तो तरी कसा काय देणार? बरे मागितलेले देव असे कसे देणार? त्याला बदल्यात काहीतरी द्यावे लागेलच ना? हे मोबदलासदृश देणे म्हणजेच नवस वा मन्नत.बरे हा नवस तरी कसा ? ‘देवा, तू मला पास कर मी तुला अकरा रुपयांचे पेढे वाटीन’, ‘तू मला एक कोटीची लॉटरी लावून दे, मग मी तुला एक हजार एक रुपये वाहीन’ वा ‘मला मुलगा होऊ दे, मी तुला बकरा वाहीन’ काय गंमत बघा, एक करोडच्या बदल्यात एक हजार रुपये, पास करण्याच्या बदल्यात पेढे, मुलाच्या बदल्यात बकरा! देवाला मतिमंद समजतो की काय आपण? बरे ते पेढे असो वा बोकड त्या देवाने नुसते पाहायचे आणि प्रसाद म्हणून आपणच गट्टम करायचे. म्हणजे देवभोळेपणात भक्त बेरका अन् देवच भोळा झाला की हो.(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत)
भ्रष्टाचाराचे मूळ नवसात!
By admin | Updated: May 7, 2017 03:50 IST