दगाफटका झाला... गाफिलपणा नडला... असंगाशी संग अंगाशी आला आणि त्यामुळं ‘गेम’ झाली... जिल्हा बँकेत मदनभाऊंना खिंडीत गाठून पाठीत खंजीर खुपसला गेला, तर जतच्या जगताप साहेबांवर थेट पुढून हल्ला झाला. ‘राजकारण असंही असू शकतं?’, असा सवाल करणाऱ्यांना ‘राजकारण असंच असतं बाबा’ हा नवा धडा वाचायला आणि पहायला मिळाला.जिल्ह्यावरची मांड पक्की करण्यासाठी इस्लामपूरकर साहेब आसुसलेत, तर ‘जिल्ह्यात आमचंबी वजन हाय’ हे सांगण्याचा चंग सोनसळकर साहेबांनी बांधलाय. एकेकाळी जिल्ह्यावर हुकूमत असणारं वसंतदादा घराणं मात्र गृहकलहानं खिळखिळं झालंय. शह-काटशह, कुरघोड्या, पायात पाय, खंजिराचे वार वगैरे वगैरे राजकारणातील संकल्पना सांगलीला नव्या नाहीत. फक्त प्रत्येक निवडणुकीत त्या व्यक्तिसापेक्ष बदलत असतात, इतकंच! जिल्हा बँकेत मदनभाऊंनी थेट हाडवैरी असलेल्या इस्लामपूरकर साहेबांशी आणि संजयकाकांशी हातमिळवणी केली, तेव्हाच कुरघोड्यांचा नवा अध्याय सुरू झाला. सोनसळकर साहेब बाजूला पडले, असं दाखवण्यात आलं. (खरं तर तसं काही नव्हतंच, ती दोघा साहेबांची ‘गंमत’ होती, असं आता दिसायला लागलंय.) या निवडणुकीत उतरण्यामागं सोनसळकर साहेबांचे दोन-तीन हेतू होते. आपली माणसं बँकेत घुसवायची, हा पहिला हेतू. जगताप साहेब-संजयकाका आणि मदनभाऊ या दगाफटका करणाऱ्यांना पाणी पाजायचं, हा दुसरा हेतू, तर जाता-जाता जिल्ह्यातली ताकद दाखवायची (ज्यांना ती जोखायची असंल, त्यांनी ती जोखावी!) हा तिसरा भाबडा हेतू! हे तिन्ही हेतू त्यांनी ‘साधवून’ घेतले. बंधूराज मोहनशेठ, जावईबापू महेंद्रआप्पा आणि जतचे पाहुणे सावंत ही स्वत:ची माणसं बँकेत आणली. त्यांच्यासोबत पॅनेलमधले शिरगावचे प्रताप पाटील, कामेरीचे सी. बी. पाटीलही आले. विशालदादानं परस्पर मदनभाऊंचा काटा काढला, तर जगतापांच्या पोराला पाहुण्यानं धोबीपछाड देऊन कुस्ती मारली. (एकाच वेळी सगळ्यांना अंगावर घ्यायची सवय जगताप साहेबांना नडते, ती अशी.) जगताप साहेबांनी घरातच उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते खार खाऊन होते. त्यातच जतच्या जागेसाठी सोनसळकर साहेबांनी विशेष जोर लावला होता. सारी रसद सोनसळकर साहेबांची असली तरी सुरेश शिंदे सरकारांनी ‘टेबल’ चालवल्यानं आणि कोरे सावकरांनी सावंतांच्या बाजूनं ‘नारळ’ वाढवल्यानंच हे साधलं गेलं. हेच ‘नारळ’वाले विधानसभा निवडणुकीत जगतापांचा झेंडा घेऊन नाचले होते आणि बँकेच्या निवडणुकीत तर बसवराज पाटील हात मागे बांधून जगताप साहेबांसोबत शेवटपर्यंत फिरत होते... पण मिरजेतल्या समितदादांच्या बंगल्यावरच्या बैठकांनी उलथापालथ केली.इस्लामपूरकर साहेब मात्र असले हेतू-बितू ठेवत नाहीत. त्यांचा आग्रह असतो, केवळ ‘करेक्ट’ कार्यक्रमाचा! बँकेवरची पकड पक्की करता-करता त्यांनी अख्खा जिल्हा कब्जात घेण्याचा ‘कार्यक्रम’ आखला आणि तो तडीस नेला. जागावाटपावेळी दादा घराण्यात उभी फूट पडली गेली, इथं साहेबांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम सुरू झाला. प्रचारादरम्यान तर त्यांनी कमाल केली. ‘मदनभाऊंना निवडून आणावंच लागेल’, ‘मदनभाऊंची काळजी आम्ही घेऊ’, मदनभाऊ कसे निवडून येत नाहीत, ते बघतो’... असं सांगत त्यांनी ‘करेक्ट मेसेज’ दिला. आता बँकेचे बारा संचालक साहेबांच्या उजव्या खिशातलेच! आटपाडीचे देशमुख, वाळवा तालुक्यातले दिलीपतात्या, बी. के. सर, शिराळ्याचे मानसिंगभाऊ आणि शंकरराव चरापलेंच्या सूनबाई, विधानसभेपासून प्रतीकदादांचा ‘हात’ सोडून नव्यानंच ‘घड्याळ’ बांधू लागलेले मिरजेचे होनमोरे, कडेगावचे संग्रामभाऊ हे सगळे साहेबांचे कट्टर समर्थक, तर आष्ट्याचे शिंदेसाहेब आणि आबा गटाचे चौघेजण हे नाही म्हटलं तरी साहेबांच्या मागं-मागं येणारे! कुणाचं राजकीय पुनर्वसन, तर कुणाच्या घरच्या माणसांची सोय... हे सगळं साहेबांनी तब्येतीनं केलंय. संजयकाका, विट्याचे अनिलभाऊ आणि डिग्रजचे जमादार सर यांना साहेबांचं ऐकण्यावाचून पर्याय नाही, त्यामुळं हे तिघं डाव्या खिशात! एवढं सगळं जमवताना एक खेळी मात्र उलटली. कामेरीच्या सी. बी. आप्पांनी साहेबांच्या सांगलीतील वाळूवाल्याला वाळूतच पालथं केलं...जाता-जाता : वसंतदादा कारखान्यासमोरच्या ‘साई’ बंगल्यावर गुलालाची पोती रिकामी होऊ लागल्यावर आणि औट उडू लागल्यावर मदनभाऊ ‘नॉट रिचेबल’ झाले. त्यांचं डोकं भणाणून गेलं असावं. मिरज तालुक्यातल्या पस्तीस सोसायट्या आपल्याच होत्या, इस्लामपूरकर साहेबांकडं वीस आणि खाडे-घोरपडेंकडं दहा-बारा सोसायट्या होत्या. त्या दिवशी कळंबीच्या फार्म हाऊसवर जेवायला साठ-बासष्ट जण आलेले, तर मतदानाआधी चाळीस-बेचाळीस जणांना उचलून नेलेलं... मग ही मतं गेली कुठं? असंगाशी संग लोकांना आवडला नाही की, दादा घराण्याशी द्रोह पसंत पडला नाही? प्रकाशबापू गटानं वाकुल्या दाखवल्या की, सोनसळकर साहेबांनी घात केला? डिग्रज-कवठेपिराननं दगा दिला की, मिरज पूर्वमधल्या घोरपडे गटानं दणका दिला? बहुदा अशा विचारानं त्यांचा मेंदू कुरतडत गेला असावा... आणि तिकडं ‘साई’ बंगल्यावर एक मोठ्ठा बुके आलेला... लालभडक गुलाबाची फुलं. त्यावर पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं, पण शुभेच्छांच्या ठिकाणी लिहिलं होतं, ‘करेक्ट कार्यक्रम’! विशालदादांनी ते वाचलं आणि फोन लावला, ‘साहेब... थँक यू...’ (ते साहेब कोणते आणि पुढं काय संभाषण झालं, हे हुश्शाऽऽर वाचकांना सांगायलाच हवं का?)- श्रीनिवास नागे
करेक्ट कार्यक्रम...
By admin | Updated: May 8, 2015 00:19 IST