चिपळूण : खेंड प्रभागात रविवारी रात्री विद्युतभारित तार कोसळली. यावेळी नगरसेवक राजू देवळेकर यांनी शाखा अभियंता अमित पवार यांना मारहाण करुन शिवीगाळ केली. आज (सोमवारी) महावितरण कंपनीच्या कार्यालयात येऊन कार्यकारी अभियंत्यांसमोरील कागदपत्रांचा ट्रे उचलून फेकून दिला व मोठमोठ्याने आरडाओरडा करुन आठ दिवसात काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला बघून घेईन, अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात देवळेकर यांच्याविरोधा आज गुन्हा दाखल झाला आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता मकरंद देवेंद्र आवळेकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात नगरसेवक देवळेकर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. खेंड येथे रविवारी जो प्रकार घडला तो दुर्दैवी होता. तेथे महावितरण कंपनीचे शाखा अभियंता अमित पवार गेले असता देवळेकर यांनी आकांडतांडव सुरु केले व शाखा अभियंता पवार यांना मारहाण केली. या घटनेमुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आज सकाळी नगरसेवक देवळेकर यांनी आपल्या दूरध्वनीवरुन भेटण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. जाब विचारण्यासाठी ते ५० ते ६० कार्यकर्त्यांसह सकाळी १२ वाजता कार्यालयात आले होते. चर्चा करताना त्यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतला. आपल्या समोर असलेल्या कागदपत्रांचा ट्रे उचलून टाकून दिला व मोठमोठ्याने आरडाओरडा केला. आठ दिवसात काम पूर्ण केले नाहीत, तर तुम्हाला बघून घेईन, अशी धमकी देऊन ते कार्यालयाबाहेर पडले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी व धमकी दिल्याप्रकरणी देवळेकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश मते करीत आहेत. या भ्याड हल्ल्याचा महावितरण कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. कामात कोण अडथळा आणत असेल, तर वेळ पडल्यास काम बंद करण्यात येईल, इशारा संयुक्त कृती समितीच्यावतीने देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)शहराच्या गजबजलेल्या मुख्य अशा भेंडीनाका परिसरात रविवारी रात्री १०.३० वाजता तुटलेली विद्युत वाहिनी जोडण्याचे काम चालू असताना नगरसेवक राजू देवळेकर यांनी कामात अडथळा आणून शाखा अधिकारी अमित पवार यांना मारहाण केली. तसेच अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली व परिसरातील ग्राहकांना जाणीवपूर्वक भडकवण्याचा प्रयत्न केला. आज कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात अनाठायी जमाव जमवून तोडफोड व शिवीगाळ करून कार्यालयीन कामात अडथळा आणला. या भ्याड हल्ल्याला आळा बसावा व नगरसेवक देवळेकर यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी संयुक्त कृती समितीने केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नगरसेवक देवळेकर यांच्यावर गुन्हा दाखल
By admin | Updated: June 29, 2015 23:06 IST